अमरचंद ठवरे- बोंडगावदेवीघरामध्ये अनुकूल असे कोणतेही शैक्षणिक वातावरण नसताना फक्त जिद्दिने खांबी/पिंपळगाव या लहानशा खेडेगावातील नंदकिशोर सदानंद ऊरकुडे या विद्यार्थ्याने बारावीच्या परिक्षेत ९३.३८ टक्के गुण घेवून यश संपादन केले. नंदकिशोरच्या अप्रतीम यशाबद्दल खांबी या गावात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. नंदकिशोरच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. वडिलांचे चान्ना/बाक्टी येथे सलुन आहे. आपल्या पारंपारिक व्यवसायातूनच ते कुटूंबाचा सांभाळ करुन सदा मुलांच्या शिक्षणासाठी विशेष काळजी घेतात. अर्जुनी/मोर येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयात नंदकिशोर बाराव्या वर्गात विज्ञान शाखेत शिकत होता. हलाखीची परिस्थिती असल्याने नंदकिशोर दररोज सायकलने नऊ किलोमीटरचा प्रवास करून शिक्षणासाठी जात होता. मनात ध्येय व जिद्द बाळगूण असणारा नंदकिशोर अशा स्थितीतही कधी निराश झाला नाही. थकून आल्यावरही तेवढय़ाच उत्साहाने तो रोज अभ्यास करायचा. त्याचे फलीतही त्याला तसेच मिळाले. बारावीच्या निकाल घोषीत झाला व त्यात नंदकिशोर ने गणित विषयात १00 पैकी ९९, रसायनशास्त्रामध्ये ९७, जिवशास्त्र ९५, भौतिकशास्त्रात ९२ गुण मिळविले. ९३. ३८ टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळविले. पुढे केमीकल इंजिनीअर बनण्याची मनीषा त्याने व्यक्त केली. वडील सदानंद, आई स्मीता व लहान भाऊ राजन असा ऊरकुडे परिवार अत्यंत साधेपणाने खाबी येथे वास्तव्यास आहे. साधारण घर असल्याने अभ्यासासाठी स्वतंत्र अशी खोली नाही. परंतु दहावी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या आई-वडिलांचे सततचे प्रोत्साहन व पोटाला चिमटा देऊन शैक्षणिक साहीत्य उपलब्ध करुन दिल्यामुळेच यशाचे शिखर गाठता आल्याची प्रतिक्रिया नंदकिशोरने व्यक्त केली. वाचना व्यतिरीक्त इतर कोणताही छंद नसल्याचेही त्याने आवर्जुन सांगितले. आई-वडील मजूरी व आपला सलुनचा व्यवसाय सांभाळून मुलांच्या शिक्षणासाठी त्यागाची वृत्ती अंगीकारत असल्याचे दिसून आले. पारंपारीक व्यवसाय न करता उच्च शिक्षण घेऊन प्रगती साधावी अशी इच्छा नंदकिशोरच्या आईने व्यक्त केली. खांबी या लहानशा खेडेगावातील नंदकिशोरचे यश ईतरांना लाजवेल असेच आहे. नंदकिशोरने दहावी मध्ये येथील मानवता विद्यालयातून ९२ टक्के गुण घेऊन पहिला क्रमांक पटकाविला होता. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करायचा तंत्र त्याने अवलंबिला होता. साध्या झोपडीमध्ये राहून नंदकिशोर मिळविलेले यश निश्चित अभिमानास्पद आहे.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून नंदकिशोरची भरारी
By admin | Updated: June 4, 2014 00:09 IST