शहरवासीयांना फटका : ५५६ कर्मचारी सहभागीगोंदिया : सध्या सुरू असलेल्या आंदोलनांच्या सत्रात आता नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची भर पडली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी पालिकेचे कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. या संपात पालिकेच्या ५३६ कर्मचाऱ्यांचा सहभाग असून यात सफाई कामगारांचाही समावेश आहे. यामुळे आधीच स्वच्छतेच्या बाबतीत बकाल असणाऱ्या गोंदिया शहराची स्थिती अधिकच बिघडणार आहे. त्यामुळे या आंदोलन शहरवासीयांना फटका बसणार असल्याचे दिसून येत आहे. ग्रामसेवकांच्या आंदोलनाने ग्रामीण भागातील व्यवस्था भरकटलेली असतानाच आता नगर पालिकेचे कर्मचारीही बेमुदत संपावर गेले आहेत. महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/ संवर्ग कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात सुरू असलेल्या राज्यस्तरीय आंदोलनात येथील ५३६ कर्मचारी संपावर गेले आहेत. राज्यातील नगर पालिका/ नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे १०० टक्के वेतन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शासनाने द्यावे, नगर पालिका मधील अनुकंपाधारकांच्या नेमणुकांसाठी स्थायी/ अस्थायी पदाची अट न घालता तत्काळ नियुक्त्या कराव्यात, शैक्षणिक पात्रता व मुळ विकल्प दिल्यानुसार लेखा शाखेत कर व प्रशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना तत्काळ सामावून घेणे, सफाई कामगारांना मोफत घरे बांधून देणे तसेच सार्वजनिक सुट्यांचा मोबदला व शैक्षणिक पात्रतेनुसार वरिष्ठ पदावर पदोन्नती देणे, मुख्याधिकारी पदावर ५० टक्के कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे, संवर्गातील कर्मचाऱ्यांनुसार मुख्याधिकारी पदाचा अतिरीक्त पदभार देणे, १२ वर्षे कालबद्ध पदोन्नती तसेच २४ वर्षांची दुसरी कालबद्ध पदोन्नती त्वरीत लागू करणे, नगर पालिकांना सुधारीत आकृतीबंध आराखडा तयार करणे, शासकीय कामाचा पाच दिवसांचा आठवडा लागू करणे यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात पालिकेतील रोजंदारी व स्थायी असे एकूण ५३६ कर्मचारी सहभागी आहेत. त्यांनी दुपारी पालिकेच्या आवारात निदर्शने केली. (शहर प्रतिनिधी)
नगर पालिकेचे कर्मचारी बेमुदत संपावर
By admin | Updated: July 17, 2014 00:10 IST