शिक्षणविभागाला दिले निवेदन : मुलींचा उपस्थिती भत्ता वाढवा
गोंदिया : १९८२ ची जूनी पेंशन योजना लागू करा या मुख्य मागणीसह १५ मागण्यांना घेऊन शिक्षक भारती संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात विविध शासन निर्णायाद्वारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा असुरक्षित केल्या आहेत. त्याबाबत शासनाचे लक्ष वेधण्याकरिता शिक्षक भारती गोंदिया जिल्हा संघटनेच्या वतीने मार्गदर्शक प्राचार्य वसंत मेश्राम, प्राचार्य कमलबापू बहेकार, विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकर, जिल्हाध्यक्ष महेंद्र सोनवाने, जीतेंद्र घरडे यांच्या नेतृत्वात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाने २८ आॅगस्ट २०१५ चा व ७ आॅक्टोबर २०१५ चा शासन निर्णय रद्द करावा, विना अनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान द्यावे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आकृतिबंध लागू करावा, रात्री शाळा वाचविण्यात याव्या, सावित्री फातिमा कॅशलेश आरोग्य कुटुंब योजना लागू करावी, ६ ते ८ वीच्या वर्गाला शिकविणाऱ्या पदविधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी देण्यात यावी, शिक्षकांचे वेतन एक तारखेला देण्यात यावे, चट्टोपाध्याय वेतन श्रेणीचे प्रस्ताव निकाली काढावे, शाळेचे वीज बिल शासनाने भरावे, शालेय पोषण आहार आॅनलाईन माहिती महिन्याच्या शेवटी भरण्यात यावी, अप्रशिक्षक शिक्षकांना सहाय्यक शिक्षकाचे आदेश देण्यात यावे, मुलींचा उपस्थिती भत्ता १ रुपयावरून ५ रुपय करण्यात यावे, सीडीपीएस कपातीचा हिशेब व स्लीप देण्यात यावी अश्या विविध मागण्यांचा समावेश होता. या संदर्भात उपशिक्षणाधिकारी माध्यमिक लोकेश मोहबंशी व उपमुख्य कार्यपालन अधिकारी सामान्य प्रशासन राजकुमार पुराम यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात जीतेंद्र पटले, प्रमेश बिसेन, बाबा जांगडे, प्रफुल्ल ठाकरे, दिलीप रहांगडाले, गुलाब मौदेकर, संतोष बारेवार, संतोष मेंढे, राजू टेंभरे, नरेंद्र बांते, किशोर बहेकार, जसपाल चक्रेल, वैशाली चौधरी, किशोर पखाले, भागवत नंदगडे, महेंद्र बघेले, उमेश टेंभरे, सुभाष महारवाडे, तरोणे, संतोष कुसराम, रमेश सोनवाने, मोहारे, पाचे, सुखचंद बिसेन व शिक्षक भारतीचे पदाधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)