लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीने जिल्हावासी दहशतीत असतानाच सोमवारची आकडेवारी दिलासा देणारी ठरली. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात सोमवारी (दि.१७) नवीन १० रूग्णांची भर पडली असतानाच ५३ रूग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.जिल्ह्यात कोरोना झपाट्याने पाय पसरत असून आजघडीला एकही तालुका यापासून सुटलेला नाही. विशेष म्हणजे, गोंदिया शहरातील प्रत्येकच भागात रूग्ण निघून आले असल्याने शहरातील प्रत्येकच भागात कंटेन्मेंट झोन दिसत आहे. त्यातही आता मुख्य बाजार भागात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने व एकाचा मृत्यू झाल्याने शहरवासी व बाजारपेठेतील नागरिकांत दहशत वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात दररोज मोठ्या संख्येत रूग्णांची वाढ दिसली असून यामुळेच जिल्ह्याची आकडेवारी ८२० च्या घरात पोहचली आहे. अशात मात्र सोमवारी (दि.१७) जिल्ह्यात १० रूग्ण आढळून आल्याने व ५३ रूग्ण घरी परतल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे.सोमवारी आढळून आलेल्या १० नवीन रूग्णांत गोंदिया शहरातील ३ रूग्ण असून १ रूग्ण लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील असून तो येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी आलेला आहे. तर ७ रूग्ण गोरेगाव तालुक्यातील आहेत. यामुळे आता जिल्ह्यातील एकूण बाधित रूग्णांची संख्या ८२० झाली आहे. यात प्रयोगशाळा चाचणीतून ६५९, रॅपीड अँटिजन चाचणीतून १५६ आणि ५ रूग्ण पर जिल्हा व राज्यातील आहेत. शिवाय ५३ रूग्ण कोरोनावर मात करून घरी गेल्याने आता एकूण क्रियाशिल रूग्ण संख्या २३३ झाली आहे. यात सोमवारी कोरोनावर मात करून घरी परतलेल्या रूग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील २३, तिरोडा तालुक्यातील १२, गोरेगाव तालुक्यातील १, आमगाव तालुक्यातील ११, सालेकसा तालुक्यातील ३, देवरी तालुक्यातील २ तर सडक-अर्जुनी येथील १ रूग्णाचा समावेश आहे. येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण १२ हजार ८३७ नमुने पाठविण्यात आले. यामधील ११ हजार ८३१ नमुने निगेटिव्ह आले असून ६५९ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. २७ नमुन्यांचा अहवाल प्रलंबीत असून ३१८ नमुन्यांच्या अहवालाबाबत अनिश्चितता आहे. जिल्ह्यात विविध संस्थात्मक विलगीकरण कक्षात १९७ व्यक्ती, गृह विलगीकरणात ८८९ व्यक्ती अशा एकूण १०८६ व्यक्ती आहेत.नागरिकांनी सावध राहणे गरजेचेजिल्ह्यात झपाट्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रूग्ण संख्या ८०० पार झाली आहे. त्यात ९ जणांना मृत्यू झाल्याने ही बाब गंभीर आहे. आता काही दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. अशात नागरिकांनी अधिक सावध राहणे गरजेचे झाले आहे. नागरिकांनी आपली सुरक्षा स्वत: करावयाची असून अत्यंत आवश्यक काम असल्यास घराबाहेर पडावे. तसेच मास्कचा वापर व फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात १२६ कंटेन्मेंट झोनजिल्ह्यात वाढत चाललेल्या रूग्ण संख्येसोबतच कंटेन्मेंट झोनमध्येही वाढ होत आहे. आजघडीला जिल्ह्यातील रूग्ण संख्या ८२० वर गेली असतानाच १२६ कंटेन्मेंट झोन झाले आहेत.