गोंदिया : शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकांच्या घरातून चार्जिंगला लावलेले मोबाइल चोरी करणाऱ्या टोळीतील ३ महिलांना शहर पोलिसांनी २९ जानेवारी रोजी अटक केली. त्या महिलांवर चार गुन्हे दाखल करण्यात आले असून, गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली होती. पोलीस कोठडीचा कालावधी झाल्यानंतर पोलिसांनी त्या महिलांना जिल्हासत्र न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले. त्या महिलांकडून २६ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.
गोंदिया शहरातून मोबाइल चोरी करणाऱ्या त्या महिला शेजारी छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथील आहेत. गोंदियाच्या रेल्वे स्थानक परिसरात विविध ठिकाणी खड्डे खोदून त्यांनी मोबाइल गाडून ठेवले होते. त्या महिलांची कसून चौकशी करून २६ मोबाइल जप्त करण्यात आले होते. आता त्यांना भंडारा येथील तुरुंगात रवाना करण्यात आले आहे.