संजय पुराम यांचे प्रतिपादन : नैतिक जबाबदारी समजून सहकार्य करा! देवरी : आमदार आदर्श ग्राम योजनेतून जनता व प्रशासन यांच्या प्रयत्नाने गाव आदर्श करणे गरजेचे आहे. आपण काय करू शकतो, ही आपली नैतिक जबाबदारी समजून सर्वांच्या सहकार्यातून ‘फुटाना’ गाव विधानसभा क्षेत्रामधील आमदार आदर्श ग्राम बनवू, असे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले. याप्रसंगी उपस्थित जनसमुदायाने त्यांना समर्थन दिले. यानंतर त्यांनी, आदर्श ग्राम बनविण्यासाठी प्रशासनातील सर्व विभाग तत्पर असून आपल्यामध्ये असलेल्या विकासात्मक कल्पना, विचार ते प्रशासनासमोर मांडून आपण त्या सर्व मिळून सोडवू, अशी हमी देत त्यांनी उपस्थितांना आश्वस्थ केले. ‘फुटाना’ गावात ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात नियोजनाविषयी विशेष ग्रामसभेत ते बोलत होते. राज्य शासनाने प्रत्येक गावाचा विकास व्हावा आणि जनतेमध्येसुद्धा आदर्श ग्रामविषयी जागृती व्हावी. प्रत्येक गाव सुजलाम, सुफलाम व्हावा या हेतूने केंद्राप्रमाणे राज्यातही ‘आमदार आदर्श ग्राम योजना ’ सुरू केली. या योजनेंतर्गत ६६ -आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी देवरी तालुक्यातील ‘फुटाणा’ या गावाची निवड केली. त्यासंबंधी ‘फुटाना’ येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात नियोजनाविषयी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी आ. संजय पुराम होते. अतिथी म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी शहारे, सरपंच नूतन बन्सोड, भाजपा मंडळ अध्यक्ष प्रमोद संगीडवार, किसान संघाचे मोहनराव पाटणकर, भाजयुमोचे तालुका महामंत्री कुलदीप लांजेवार, उपसरपंच भोयर मंचावर उपस्थित होते. या वेळी ग्रामसभेत एक वर्षाचा सर्व विभागांच्या विकास कामांचा नियोजनाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये महिला व बालविकास, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सडक-अर्जुनी, पंचायत विभाग, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभाग, एन.आर.एल.एम. पंचायत समिती, जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग देवरी, आरोग्य विभाग, पंचायत समिती कृषी विभाग, तालुका कृषी विभाग, पशुवैद्यकीय विभाग, ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत १४ वा वित्त आयोग निधी, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी उपविभाग, सामाजिक वनीकरण विभाग इत्यादी विभागांतर्गत ८३७.०१ लाख एवढ्या रूपयांच्या विकास कामांचा नियोजनाचा आढावा घेण्यात आला. या ग्रामसभेत सर्व विभागांचे अधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामवासी उपस्थित होते. संचालन सचिव नागराडे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)
फुटाना गावाला आमदार आदर्श ग्राम बनविणार
By admin | Updated: July 21, 2016 01:09 IST