मुन्नाभाई नंदागवळी।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीवर आधारित आहे. त्यामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील शेतीची कामे आटोपल्यानंतर शेतमजूर आणि मजुरांच्या हाताला काम नसते. तर यंदा निवडणूक आचारसंहितेमुळे मनरेगाची कामे सुध्दा सुरु झालेली नाही. परिणामी रोजगाराच्या शोधात मजूरवर्ग जिल्ह्याबाहेर व परराज्यात स्थलातंरण करीत असल्याचे चित्र आहे.अनेक गावांमध्ये रोजगाराचे पुरेसे साधन नाही, नैसर्गिक हवामानाचे ऋतू बदलतात, तसा मजुरांना सुध्दा रोजगार शोधावा लागतो. उन्हाळ्यामध्ये तेंदूपत्ता संकलनाचे काम मिळते. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास थोडाफार आधार मिळतो. दरवर्षी मनरेगाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु असतात त्यामुळे मजुरांना गाव परिसरातच रोजगार उपलब्ध होतो. मात्र यंदा प्रशासनाने मनरेगाच्या कामाचे नियोजन निवडणूक आचारसंहितेपूर्वी न केल्याने मागील महिनाभरापासून मजुरांच्या हाताला काम नाही. जिल्ह्यातील मजूर दरवर्षी सोयाबीन कापणी, कापूस वेचणीच्या कामासाठी दुसऱ्या जिल्ह्यात जातात. रोवणी सुध्दा करायला महिला मजूर जातात. तर आंध्रप्रदेशात मिरची तोडणीसाठी दरवर्षी जिल्ह्यातील मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात जात असतो. या ठिकाणी त्यांना जवळपास दोन महिने रोजगार प्राप्त होतो. यामुळे त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास थोडीफार मदत होत असते. एप्रिल ते जून महिन्यापर्यंत तेंदूपत्ता तोडणीचा हंगाम असतो. यासाठी सुध्दा मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात जिल्ह्याबाहेर जातात. अर्जुनी मोरगाव तालुक्यासह इतरही तालुक्यातील मजूरवर्ग सध्या तेंदूपत्ता तोडणीसाठी दुसºया जिल्ह्यात जात असल्याचे चित्र आहे.दरवर्षीप्रमाणे आम्ही तेंदूपत्ता संकलासाठी मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, छत्तीसगड या राज्यात जातो.काही मजूर, मुंसी, ड्रायव्हर, चेकर, मॅनेजर अशा पदाच्या कामासाठी जातात. मी चेकर म्हणून कामाला जात आहे.- मनोहर कांबळे, माजी तंमुस अध्यक्ष बाराभाटीमी अनेक वर्षांपासून तेंदूपत्ता हंगामासाठी बाहेर जिल्ह्यात जातो. यंदा वर्धा जिल्ह्यातील तेंदूपत्ता कामासाठी जात आहे. हमालटोली, ड्रायव्हर, मजूर असे अनेक मजूर सोबत घेवून आलो. मी व्यवस्थापक या पदावर कामावर असून यातून ३० ते ४० दिवस रोजगार मिळतो.-सुरेश खोब्रागडे, माजी उपसरपंच येरंडी.
रोजगार उपलब्ध करावागोंदिया जिल्ह्यात उद्योगांचा अभाव असल्याने शेती शिवाय मजुरांना दुसरे काम नाही. त्यामुळे कृषीवर आधारित रोजगार उपलब्ध झाल्यास मजुरांना कामाच्या शोधात इतत्र भटकंती करावी लागणार नाही.स्थानिक लोकप्रतिनिधीनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
अनेक गावात रोजगार हमी बंदचयावर्षी परिसरातील अनेक गावात रोजगार हमीच्या कामांचा नारळ फुटलाच नाही. रोजगार सेवकांनी तसेच पंचायत समितीनी कामाचा आढावा घेतला नाही, कामे काढलेच नाही. परिणामी मजुरांच्या हाताला काम नसल्याने मजुरांचे स्थलातंरण होत आहे.
लघु उद्योग व कुटीर उद्योग नाहीग्रामीण भागात प्रत्येकच गावात लघु किंवा कुटीर उद्योग चालत नाही, अनेक लघु उद्योग बंद पडले, बांबु कामाचा पत्ता कट झाला आहे. मोहफुलांची बंदी, पळसाच्या बियाणे, आंबा घुही, टोरी संकलन असे अनेक उद्योग अनेक दिवसांपासून बंद पडले आहेत.