गोरेगाव : सदरक्षणाय खलनिग्रहनाय हे पोलिसांचे ब्रिदवाक्य आहे. या ब्रिदवाक्याला समोर ठेवून पोलीस आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र हे कर्तव्य बजावताना दुर्जनांना शिक्षा आणि सज्जनांबद्दल आपुलकी ठेवण्यासाठी पोलीस विभागाला मोठी कसरत करावी लागते. यात अनेकदा गफलत होऊन पोलिसांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनच बदलून जातो. त्या दृष्टिकोनाला बगल देत गोरेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र शिंदे यांनी मंगळवारी रमजान ईदचे औचित्य साधून सामाजिक बांधीलकी दाखवत सामाजिक वातावरण चांगले ठेवण्यात पोलिसांची भूमिका किती महत्वाची असते हे सिध्द करून दिले. जिल्ह्याच्या इतिहासात पोलीस निरीक्षक शिंदे यांनी प्रथमच असा विशेष उपक्रम राबवून समाजासमोरच नाही तर पोलीस खात्यासाठीही एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. मंगळवारी मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईदनिमित्त सकाळपासून पोलीस निरीक्षक शिंदे यांनी तालुक्यातील मुस्लीम बांधवांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. अनपेक्षितरीत्या त्यांनी दाखविलेल्या या सौजन्याने मुस्लिम बांधव हरखून गेल्याचे दिसून येत होते.ईस्लाम धर्मात ईददुलफिन्न म्हणजे रमजान ईद अत्यंत महत्वाचा सण आहे. या सणाला प्रत्येक मुस्लीम बांधवात एक वेगळा उत्साह असतो. हा सण मोठ्या उत्साहात जिल्हाभर सर्वत्र साजरा करण्यात आला. गोरेगाव तालुक्यात गोरेगाव, घोटी, पाथरी, कुऱ्हाडी, मुंडीपार, चोपा या ठिकाणी ईदनिमित्त नमाज पठन करण्यात आले. ईदचे औचित्य साधून पोलीस व नागरिकांमध्ये समन्वय साधण्याची संधी पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांनी सोडली नाही. त्यांनी पोलीस पथकासह नमाज पठनच्या ठिकाणी, एवढेच नाही तर मुस्लीम समाजात नेतृत्वाची भूमिका स्विकारणाऱ्या मुस्लीम बांधवाच्या घरी भेटी त्यांच्याशी हितगुज केले. यावेळी त्यांच्यासोबत गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पो.निरीक्षक भरत कऱ्हाडे, अशोक येळे, मधुकर पोटफोडे, उदेभान इंदुरकर, शशिकांत जोगेकर, दीपक खोटेले आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
गोरेगावच्या ठाणेदारांनी दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश
By admin | Updated: July 29, 2014 23:55 IST