शेतकऱ्यांची लुबाडणूक : सहा उत्पन्न बाजार समित्यांकडून कारवाईच नाहीगोंदिया : दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांना आपला धान विकल्याशिवाय पर्याय नाही. पण हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अगतिकतेचा फायदा घेत ठिकठिकाणी व्यापाऱ्यांकडून कमी भागात शेतकऱ्यांकडील धान विकत घेतला जात आहे. या नियमबाह्य खरेदीला रोखण्यासाठी त्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यास कृषी उत्पन्न बाजार समित्या कुचराई करीत आहे.यावर्षी कमी पाऊस आणि नंतर रोगाच्या प्रादुर्भावातून वाचविलेल्या धानाची शेतकऱ्यांनी चुरणी-मळणी केली. दिवाळीपूर्वी धान विकुन दिवाळीचा सण साजरा करण्याची आशा त्यांना होती. मात्र आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू होऊ न शकल्याने त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. दिवाळीपूर्वी धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे नाईलाजास्तव ते धान व्यापाऱ्यांना पडक्या भावात विकावे लागले. ठिकठिकाणचे व्यापारी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट करीत आहेत. मात्र त्या व्यापाऱ्यांना अभयदान देण्याचे काम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून सुरू आहे. आधारभूत किमतीच्या कमी किमतीत व्यापाऱ्यांनी धान खरेदी केली असताना त्या व्यापाऱ्यांवर अद्याप कारवाईच झालेली नाही. गोरेगाव तालुका वगळता जिल्ह्यात कोणत्याच कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी चुकीच्या पध्दतीने धान खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केलेली नाही. (तालुका प्रतिनिधी)चारच ठिकाणी बाजार समित्यांकडून धान खरेदीगोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठ दिवसांपासून धान खरेदी सुरू झाली असून ३० हजार पोती धान खरेदी केल्याचे सचिव जोशी यांनी सांगितले. आधारभूत किमतीत धान खरेदी करण्यात येत असून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लुबाडणूक करू नये अशा सूचना सर्व व्यापाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. परंतु एकाही व्यापाऱ्यावर कारवाई केली नाही. अर्जुनी-मोरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारपासून (दि.९) धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहे. फक्त १०० पोती धान खरेदी करण्यात आल्याची माहिती सचिव अशोक काळबांधे यांनी दिली. परंतु व्यापाऱ्यांवर कारवाई झाली नाही. आमगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे २३ हजार ३५ क्विंटल धान खरेदी केल्याची माहिती सचिव सुभाष चव्हाण यांनी दिली. सामान्य धानाला १४५० तर चांल्या धानाला १७०० रूपये भाव देण्यात आला आहे. निकृष्ट दर्जाच्या धानाला १२५० ते १२७५ भाव देण्यात येत आहे. जे धान निकृष्ट दर्जाचे आहे त्यासाठी शेतकऱ्यांकडून लिहून घेण्यात येत आहे. व्यापाऱ्यांवर एकही कारवाई झाली नाही. सडक-अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे धान खरेदी सुरू झालीच नाही. व्यापाऱ्यांकडून पडलेल्या किमतीत मोठ्या प्रमाणात धान खरेदी केला जात आहे, असे सभापती डॉ.अविनाश काशिवार यांनी सांगितले आहे. देवरी येथे जागा उपलब्ध नसल्याच्या कारणाने धान खरेदीला कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरूवातच केली नाही, असे सभापती रमेश ताराम यांनी सांगितले. याचा फायदा व्यापारी घेत आहेत. गोरेगाव येथे धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. परंतु शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या पाच व्यापाऱ्यांवर कारवाई केल्याची माहिती सचिव आशिष बघेले यांनी दिली. तिरोडा येथेही धान खरेदीला सुरूवात झाली नाही, तर व्यापाऱ्यांवरही कारवाई झाली नसल्याची माहिती सभापती चिंतामन रहांगडाले यांनी दिली आहे.क्विंटलमागे ३०० चे नुकसान१ नोव्हेंबरपासून धान खरेदी केंद्र सुरू होतील अशी शेतकऱ्यांना आशा होती. त्यानंतर दोन-चार दिवस त्यांनी वाटही पाहिली, मात्र धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांनी दिवाळी सण करण्यासाठी मिळेल त्या किमतीत व्यापाऱ्यांना धान विकणे सुरू केले. आधारभूत किमतीच्या कितीतरी कमी किमतीने व्यापाऱ्यांकडून धान खरेदी सुरू आहे. शासनाने सामान्य धानाला १४१० तर ‘ए’ ग्रेड धानाला १४६० रूपये किंमत ठेवली. मात्र व्यापाऱ्यांकडून ११०० व १२०० क्विंटल या दराने धान खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना क्विंटलमागे ३०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. पैश्याची चणचण असल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने हे नुकसान सहन करावे लागत आहे.
व्यापाऱ्यांना बाजार समित्यांचे अभय
By admin | Updated: November 10, 2015 02:22 IST