गोंदिया : नकली नोटा चलणात आणणाऱ्या टोळीतील दोन सदस्य असलेल्या व्यापाऱ्यांच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. न्यायालयाने त्या व्यापाऱ्यांना १५ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली आहे. आमगाव येथील नवेद्यम रेस्टॉरेंटचे मालक प्रल्हाद सुरेशप्रसाद दुबे व नवीन कृष्णकुमार असाटी (२६) दोन्ही रा. आमगाव यांना ५ जुलैच्या सायंकाळी ५.३० वाजता ५०० रुपयाच्या ३४ नकली नोटांसह अटक करण्यात आली होती. या आरोपींना न्यायालयाने ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या दरम्यान पोलिसांनी प्रल्हाद दुबे यांच्या घराची झडती घेवून ५०० रुपयाच्या ४१ नोटा पुन्हा जप्त केल्या होत्या. या पोलीस कोठडीत त्यांनी दिलेल्या कबुलीत त्यांचे कनेक्शन अकोला येथे असल्याचे सांगण्यात आले. अकोला येथील मनोज पवार नावाचा तरुण स्वत: च्या घरी नोटा छापण्याची मशीन लावून वडील दीपक पवार यांच्या मदतीने ते नकली नोटा चलणात आनायचा. यासाठी उपाध्याय व शिवाजी हे दोन व्यक्ती या नकली नोटांना विक्री करण्यासाठी अनेकांसोबत डिल करायचे. या आरोपींना अकोला पोलिसांनी पकडले. त्या आरोपींना आमगाव पोलीस आपल्या गुन्ह्यात घेणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी दिली आहे. प्रल्हाद दुबे व नवीन असाटी या दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आल्याने या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे.
‘त्या’ व्यापाऱ्यांचा १५ पर्यंत पीसीआर
By admin | Updated: July 12, 2014 01:23 IST