केशोरी : अर्जुनी/मोर तहसील कार्यालयात दहावी आणि बारावी पास होणारे विद्यार्थी जातीचे प्रमाणपत्र, वंशावळी, क्रिमीलेअर प्रमाणपत्र, हलपनामा आदी दस्तऐवज तयार करण्यासाठी आवश्यक स्टॅम्पपेपर घेण्यासाठी जातात. तेव्हा स्टम्पपेपरचा तुटवडा असल्याचे सांगून सेतू केंद्र व मुद्रांक विक्रेते १०० रुपयाचा स्टॅम्पपेपर ११० रूपयास विकून ग्राहकांची लुबाडणूक करीत आहेत. याशिवाय सेतू केंद्राचे संचालक ८ रुपयाची पावती देऊन ४० रुपये घेत आहेत. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन यांच्यावर निर्बंध घालण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे. महसूल विभागाचे कोणतेही दस्तऐवज तयार करण्यासाठी स्टॅम्पपेपरची किमत निर्धारित असतानासुद्धा मुद्रांक विक्रेते ग्राहकांकडून अधिकचे पैसे घेऊन लुबाडणूक करण्याचा गोरकधंदा चालवित आहेत.शासनाकडून स्टॅम्प व्हेन्डरला स्टॅम्प किमतीच्या प्रमाणात कमिशन मिळत असतानादेखील स्टॅम्प तुटवडा असल्याची बाब पुढे करुन ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. तसेच अर्जुनी/मोरगाव तहसील कार्यालयातील सेतू केंद्राचे संचालक ग्राहकांना ७ किंवा १० रुपयाची पावती देऊन ४० ते ५० रुपयापर्यंत रक्कम वसूल करीत आहेत. यासंबंधी चौकशी केली असता असे पैसे सगळीकडेच घेतात, असे सांगून ग्राहकांशी उर्मट वक्तव्य करुन एक प्रकारची बेबंदशाही दाखविण्याचा हा प्रकार आहे. यावरुन त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभय असल्याचे बोलल्या जाते. वरिष्ठांचे अभय असल्यामुळे मुद्रांक विक्रेते व सेतू केंद्राचे संचालक हा गोरखधंदा करीत आहेत.या प्रकारामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील होणारी लुबाडणूक थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
मुद्रांक विक्रेते व सेतू केंद्राद्वारे लुबाडणूक
By admin | Updated: July 16, 2014 00:17 IST