गोंदिया : शेतीच्या पाण्यासाठी झालेल्या वादातून लहान भावाला यमसदनी पाठविणाऱ्या मोठ्या भावाला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मसरामटोला येथील मनिराम ढिवरू पंधरे (५६) याने १६ एप्रिल २०१४ च्या सायंकाळी ६ वाजतादरम्यान धाकटा भाऊ भूवन दिवारू पंधरे (५०) याच्यासोबत शेतातील विहीरीत असलेल्या बोअरवेलच्या पाण्यावरून भांडण झाले होते. या भांडणात आरोपीने खाटेच्या ठाव्याने भूवनच्या डोक्यावर मारले. साकोलीनजीक रात्री १.३० वाजतादरम्यान त्याचा मृत्यू झाला.या प्रकरणातील साक्षीदार मार्तंड उईके यांच्या पुतणीच्या लग्नाचे कार्य होते. लग्न आटोपल्यावर सायंकाळी ६ वाजतादरम्यान आरोपी व मृतक भुवन ढिवरू पंधरे (४०) हे जेवत होते. यावेळी मनिरामने विहीरीचे पाणी शेतीला देण्यासाठी भुवनकडे मागणी केली. परंतु पाणी देण्यास त्याने नकार दिल्यामुळे त्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यातच रागाच्या भरात मनीरामने भुवनच्या डोक्यावर ठाव्याने मारून गंभीर जखमी केले. त्याला उपचारासाठी शेंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी नागपूरला रवाना केले असता उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेसंदर्भात देवरी पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर निर्णय बुधवारी देण्यात आला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.जी. गिरटकर यांनी प्रकरणाची सुनावणी केली. या प्रकरणातील आरोपी मनिरामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून अॅड. प्रशांत डोये यांनी काम पाहिले. तपास सहाय्यक फौजदार मुलचंद रोडगे यांनी केला. आरोपीला जन्मठेप व पाच हजार रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास सहा महिन्याची शिक्षा सुनावली आहे. अॅण्ड. प्रशांत डोये यांनी यापूर्वी अनेक प्रकरणातील आरोप सिध्द करून दाखविले आहेत. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात सीएमएसचे प्रभारी महेश महाले व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी पार पारडे. (तालुका प्रतिनिधी)
लहान्याच्या खूनप्रकरणी मोठ्या भावाला जन्मठेप
By admin | Updated: June 4, 2015 00:48 IST