वामन लांजेवार - शेंडा/कोयलारीसडक/अर्जनी तालुक्यातील सलंगटोल्याचे आदिवासी स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही रस्त्याअभावी हलाकीचे जीवन जगत आहेत. त्यांना गावाबाहेर जाण्यासाठी हक्काचा मार्ग नसल्यामुळे आजही ते विकासापासून कोसो दूर आहेत.सलंगटोला हे गाव दल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असून त्या गावात शंभर टक्के आदिवासी समाजाचे लोक पिढ्यानपिढ्यापासून वास्तव्यास आहेत. परंतु आजही त्या गावात जाण्याकरिता रस्ता नसल्याने तलावाच्या पाळीने किंवा शेतातील धुऱ्याने जावे लागते, हे वास्तव आहे. पावसाळ्यात तर घराबाहेर निघण्यासाठी त्यांना दहावेळा विचार करूनच निघावे लागते. सडक/अर्जुनी तालुक्यातील प्रत्येक गावाला व टोल्यांना डांबरीकरण मार्गाने जोडले आहे. त्यामध्ये सलंगटोला अपवाद आहे. यावर्षी तापाच्या साथीचे थैमान मांडले. या गावातील रूग्णांना औषधोपचारासाठी चारचाकी वाहनाने इतरत्र हलवायचे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. रूग्णाला खाटेवर मांडून दल्ली किंवा लेंडीटोला या गावापर्यंत प्रथम आणावे लागते. त्यानंतरच इतरत्र हलवावे लागते.त्या गावातील लहान चिमुकल्यांना शेतातील धुऱ्याने दल्ली येथे प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी ने-आण करावी लागते. पावसाळ्यात गवताचे प्रमाण अधिक असल्याने साप, विंचू किंवा जमिनीवर इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका नाकारता येत नाही. माध्यमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी उशिखेडा, शेंडा आणि डोंगरगाव (डेपो) येथे जातात. परंतु पावसाळ्यात रस्त्याअभावी बुटी मारतात. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होते. रेशनचे धान्य आणण्याकरिता दल्ली येथे जावे लागते. परंतु पावसाळ्यात सायकलने जाणे कठिण असल्यामुळे डोक्यावर ओझे वाहून आणावे लागते. अशातच धुऱ्यावरून पाय घसरला तर धान्य बांध्यात सांडण्याचीच भीती अधिक असते. सडक/अर्जुनी तालुक्याच्या नकाशातून सलंगटोला हे नाव काढण्यात आले असेल, असे उद्गार एका तरूणाने काढले. निवडणूक काळात आम्ही तुम्हाला जाण्या-येण्यासाठी हक्काचा रस्ता तयार करून देवू, असे सर्वच पक्षाचे उमेवार सांगतात. परंतु निवडणूक संपली की विजयी उमेदवार त्या गावाकडे फिरकतही नसल्याचे सांगण्यात आले. दल्ली ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत आम्ही प्रामुख्याने रस्त्याचा विषय मांडतो. परंतु आजपावेतो त्याची दखल घेण्यात आली नाही, असे अनेक युवकांनी लोकमतशी बोलताना सांगितले. सलंगटोला गावाच्या रस्त्याची समस्या अनेकदा उजेडात आली. परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही. तसेच लोकप्रतिनिधींनीसुद्धा या समस्येवर तोडगा काढला नाही. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपैयी यांच्या काळात पंतप्रधान ग्राम सडक योजना राबविण्यात आली होती. ही योजना अत्यंत लाभदायक असल्यामुळे तत्कालिन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात अविरत सुरू राहिली. तरीही प्रशासनाच्या कामचुकार प्रवृत्तीमुळे सलंगटोल्याचे आदिवासी रस्त्याअभावी मरणयातना भोगत आहेत. आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी शासन दरवर्षी करोडो रूपये खर्च करते. परंतु प्रशासकीय अधिकारी आपल्या हट्टी प्रवृत्तीने त्याला तडा देण्याचा मार्ग अवलंबतात. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला आदेश देवून सलंगटोला या आदिवासी गावाच्या रस्त्याची समस्या दूर करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
आदिवासी रस्त्याअभावी जगताहेत हलाखीचे जीवन
By admin | Updated: September 21, 2014 23:53 IST