गोंदिया : रेल्वे गाडीच्या धडकेत बिबट ठार झाल्याची घटना सालेकसा तालुक्यातील टोयागोंदीजवळ शनिवारी (दि.२५) सकाळी उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार सालेकसा तालुक्यातील दरेकसा रेल्वे स्थानकापासून ३ किमीवरील टोयागोंदी रेल्वे मार्गावरील पोल क्रमांक ९४७/२७ जवळ एक बिबट मृतावस्थेत आढळला. याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी पोलिस व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. या बिबट्याचा मृत रात्रीच्या वेळेस रेल्वे गाडीने धडक दिल्याने झाल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. पोलिस व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. यानंतर मृत बिबट्याचे शवविच्छेदन करुन त्याच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी राठोड, वनपाल ब्राह्मणे, वनरक्षक बडोले, फुंडे, पोलिस पाटील बांबोेडे उपस्थित होते.
घटनांमध्ये होतेय वाढ
तीन दिवसांपुर्वीच गोंदिया-चांदाफोर्ट मार्गावर रेल्वे गाडीच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता दरेकसाजवळ रेल्वे गाडीच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. तर मागील वर्षी अर्जुनी मोरगावजवळ रेल्वे गाडीच्या धडकेत तीन बच्छड्यांचा आणि तीन अस्वलांचा मृत्यू झाला होता. रेल्वे गाडीच्या धडकेत वन्यप्राणी ठार होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने याला प्रतिबंध लावण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.