राजीव गांधी जीवनदायी योजना : खासगी रुग्णालयात होते रुग्णांची बोळवणदेवानंद शहारे - गोंदियाबायपास सर्जरी, हृदयाच्या आजारासाठी केली जाणारी सर्जरी, व्हॉल्व बदल व केमोथेरपी आदी मोठ्या आजारांचे उपचार करवून घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. अशा आजारांवर नि:शुल्क उपचार करण्यासाठी शासनाने २१ नोव्हेंबर २०१३ रोजी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा शुभारंभ केला. याअंतर्गत गेल्या आठ महिन्यात केवळ ३६८ रूग्णांनाच योजनेचा लाभ मिळू शकला. त्यामुळे या योजनेला गती देण्यात आरोग्य प्रशासन आणि संबंधित यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसून येते.राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला एक आरोग्य कार्ड तयार करून घ्यावे लागते. हे आरोग्य कार्ड तयार करण्यासाठी कुटुंबाचे रेशन कार्ड व रेशन कार्डात नाव असलेल्या सर्व सदस्यांच्या ओळखपत्रांची गरज असते. मागील आठवड्यापर्यंत गोंदिया जिल्ह्यात एकूण एक लाख ९२ हजार कुटुंबांनी आरोग्य कार्ड तयार करून घेतल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात या योजनेसाठी पात्र असणाऱ्या कुटूंबांची संख्या दोन लाख ३६ हजार आहे. त्यामुळे अजून ४० हजार कुटुंबीय या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारे आरोग्य कार्ड तयार करण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे हे कुटुंबिय सदर योजनेच्या माहितीपासूनच अनभिज्ञ असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या योजनेच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी स्थानिक स्तरावर कोणताही निधी खर्च केला जात नसल्यामुळे या योजनेबाबत नागरिक अजूनही अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेचे आरोग्य कार्ड नसल्यास त्यांना रेशन कार्डद्वारे लाभ घेता येतो. त्यामुळेच अनेकांनी हे आरोग्य कार्ड तयार करून घेण्यासाठी उत्सुकता दाखविली नसल्याचे संबंधित यंत्रणेतील लोक सांगतात.आता नवीन व जुन्या अशा दोन्ही रेशन कार्डधारकांना सदर योजनेचा लाभ घेता येतो. यात पिवळे, केशरी, अन्नपूर्णा व अंत्योदय रेशन कार्डधारकांचा समावेश आहे. या योजनेच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर संग्राम केंद्र स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात एकूण ५५० ग्रामपंचायती आहेत. ग्रामपंचायत स्तरावर आरोग्य शिबिर घेतली जातात. योजनेच्या माध्यमातून एकूण ९७१ रोगांवर पाच हजार ते १.५ लाख रूपये शासनाच्या खर्चाने औषधोपचार केला जातो. आकाशवाणीच्या माध्यमातून याबाबतचा प्रचार केला जातो.
आठ महिन्यांत केवळ ३६८ रूग्णांना लाभ
By admin | Updated: August 8, 2014 00:01 IST