तिरोडा : तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी तिरोड्याचे माजी नगराध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सचिव डॉ.अविनाश जयस्वाल यांची निवड झाली आहे. त्यांनी भाजपाचे चिंतामन रहांगडाले यांचा ७ विरूद्ध ६ असा पराभव करून सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे कायम ठेवले.सभापती वाय.टी.कटरे यांनी हैदराबाद येथे झालेल्या कार अपघातानंतर बाजार समितीचे काम सांभाळण्यास अक्षम असल्याचे सांगत राजीनामा दिला होता. तसेच प्रभा घरजारे यांनीही संचालकपदाचा राजीनामा दिला होता. याशिवाय त्या अपघातामध्ये वत्सला शिरपुरे, पोवरनबाई पटले आणि भरतभाऊ बघेले हे तीन संचालक ठार झाले होते. त्यामुळे १८ पैकी ५ संचालकपद रिक्त असल्याने १३ संचालकांनीच या निवडणुकीत सहभाग घेतला.निवडणूक निर्णय अधिकारी सहकार उपनिबंधक अशोक गोस्वामी यांच्या उपस्थितीत झालेल्या या निवडणुकीत ६ विरूद्ध ७ मतांनी डॉ.अविनाश जयस्वाल विजयी झाले. ही निवडणूक शुक्रवारी दुपारी १२ ते १ वाजताच्या दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात पार पडली. डॉ.जयस्वाल यांच्या बाजुने स्वत: त्यांच्यासह राजकुमार केशरवाणी, चुन्नीलाल पटले, राधेलाल पटले, मिलिंद कुंभरे, खुशाल शहारे, घनश्याम पारधी यांनी मतदार केले तर भाजपचे रहांगडाले यांच्या बाजुने त्यांच्या स्वत:च्या मतदानासह हेमराज अंबुले, रमेश टेंभरे, सुखदेव मेश्राम, संदीप अग्रवाल, दिलीप असाटी यांनी मतदान केले. (तालुका प्रतिनिधी)
तिरोडा बाजार समितीच्या सभापतीपदी जयस्वाल
By admin | Updated: July 19, 2014 23:58 IST