सौंदड : सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा येथे संस्थापक संस्था अध्यक्ष जगदीश लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, पर्यवेक्षिका कल्पना काळे, मुख्याध्यापक मनोज शिंदे यांनी विलगीकरण कक्षासाठी आवश्यक सोयी सुविधांसह इमारत उपलब्ध करून दिली आहे.
सौंदड गावात कोरोना बाधित रुग्णांची झपाट्याने वाढ होत असून काही कोरोना बाधित रुग्ण देखील या साथरोगामुळे दगावले आहेत. यावर प्रतिबंधासाठी सरपंच गायत्री इरले यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन समितीची सभा ग्रामपंचायत कार्यालय सौंदड येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी जगदीश लोहिया यांनी कोरोनाच्या या भयावह दुसऱ्या लाटेच्या संकटात सर्व गावकऱ्यांच्या समस्यांचा जाणिवेतून स्वयं प्रेरणेने विलगीकरण केंद्रासाठी संस्था अंतर्गत विद्यालयाच्या सर्व भौतिक सुविधायुक्त प्रशस्त इमारती उपलब्ध करून देण्याबाबत सभेत आपली इच्छा व्यक्त केली. यावेळी ग्रामविस्तार अधिकारी आर.डी. देशमुख, ग्रामपंचायत सदस्य व आपत्ती व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सडक अर्जुनीचे तहसीलदार उषा चौधरी यांनी कोरोना बाधित रुग्णांना विलगीकरणासाठी शाळेची इमारत उपलब्ध करण्याबाबतचे पत्र दिले आहे. त्यानुसार रुग्णांना सोयीसाठी इमारतीची स्वच्छता करून विलगीकरणासाठी इमारत उपलब्ध करून दिली आहे. जगदीश लोहिया नेहमीच आपले योगदान देत असल्यामुळे संस्थेंतर्गत कर्मचारीही प्रेरणा घेऊन नेहमीच कठीण परिस्थितीतही पुढे येऊन कार्य करीत असतात.