शेंडा/कोयलारी : शेतकर्यांना पिकासाठी पाणीसाठा उपलब्ध व्हावा या उदात्त हेतूने विविध योजनेतून विहीरी मंजूर झाल्या आहेत. परंतु मागील दोन वर्षापासून सातपैकी एकही विहिरीचे खोदकाम करण्यात आले नाही. सडक/अर्जुनी ग्रामपंचायत कार्यालयात मागील दोन वर्षापासून सात विहिरी मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी एकही विहीरीचे बांधकाम करण्यात आले नाही, अशी तक्रार शेतकरी वारंवार करीत आहेत. याची शहानिशा सदर प्रतिनिधीने केली असता ग्रामविस्तार अधिकारी हटवार व खंडविकास अधिकारी धांडे यांच्याशी केली असता त्या दोघांनीही रेशोची समस्या सांगीतली. शेतकर्यांना सिंचनाच्या सोई उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध योजनेच्या माध्यमातून शंभर टक्के अनुदानावर शेतात विहीरीचे बांधकाम करण्यात येते. परंतु त्या विहीरीच्या बांधकामासाठी शेतकर्यांना हेलपाट्या खाव्या लागतात. सडक/अर्जुनी ग्रामपंचायतचे ग्रामविस्तार अधिकारी हटवार यांनी सांगितले की, आमच्याकडे सात विहिरी मंजूर आहेत. परंतु विहीर बांधकाम करण्यासाठी कुशल व अकुशल कामावर ४0 ते ६0 असा रेशो आहे. त्यासाठी ग्रामपंचायतला आपल्या स्तरावर किमान २0 लाखाचे माती काम करावे लागेल तरच फक्त एका विहिरीचे बांधकाम होईल अन्यथा होणार नाही. वस्तुस्थिती जावून घेण्याकरीता सदर प्रतिनिधीने खंडविकास अधिकारी धांडे यांच्याशी भेट घेतली असता ते म्हणाले की, अगोदर पंचायत समिती स्तरावर कामे करण्यात येत होती. त्यामुळे विहिर बांधकाम होत होते. परंतु आता ग्रामपंचायत स्तरावर काम केले जाते. त्यामुळे विहिर बांधकाम रखडले. शासन शेतकर्यांना विहिरी मंजूर केल्याचा गवगवा करून शेतकर्यांची दिशाभूल करीत आहे. शेतकर्यांना वाटेल तेवढे पुरावे मागितले जातात. आपल्याला विहीर मंजूर होईल. या आशेने दक्षिणा देण्यास तयार होतो. परंतु त्याच्या पदरी निराशाच पडते. शेतकर्यांना विहिरीची आवश्यकता आहे. रेशोची नाही, असे शेतकरी दोन वर्षापासून बोलत आहेत. शासनाने मंजूर केलेल्या विहिरींना रेशोच्या कचाट्यातून दूर सारुन विहीर बांधकाम करून देण्याची मागणी सडक/अर्जुनी येथील शेतकर्यांनी केली आहे. (वार्ताहर)
शेतातील सिंचन विहिरी दोन वर्षांपासून कागदावरच
By admin | Updated: May 31, 2014 23:35 IST