सालेकसा : तालुक्यांतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत कहाली येथील ग्रामसेवक के.व्ही. तावाडे यांच्यावर १० लाख २५ हजार ६१३ रुपयांची अफरातफर केल्याचा चौकशी अहवाल पंचायत समिती सालेकसाने जिल्हा परिषदेला पाठविला. परंतु अजूनपर्यंत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. यामुळे सदर ग्रामसेवकाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच अभय देण्यात येत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. ग्रामसेवक के.व्ही. तावाडे यांची बदली करण्यात यावी, त्यांच्या कारभाराची चौकशी करावी म्हणून ग्रामपंचायतचे पदाधिकारी तथा गावकरी यांनी पंचायत समिती सालेकसा येथे ९ आॅक्टोबर २०१३, ३ नोव्हेंबर २०१३, १० मार्च २०१४, ३१ जुलै २०१४ रोजी लेखी तक्रारी दिल्या. परंतु या तक्रारींना प्रशासनाने केराची टोपली दाखविली व अफरातफर करणाऱ्या ग्रामसेवकासोबत असल्याचे दाखवून दिले. ग्रामपंचायतचा निधी खर्च करण्यात आला. पण रोकडवहीला नोंद नाही. प्रमाणके उपलब्ध नाहीत. पर्यावरण संतुलित ग्राम समृध्दी योजनेची नियमबाह्य ८५ हजार रुपयांची प्रमाणकाशिवाय काढून अफरातफर करणे, याबद्दलची चौकशी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी केली. १० लाख २८ हजार ६१३ रुपयांची अफरातफर केल्याचा व नियमबाह्य खर्च केल्याचा चौकशी अहवाल खंडविकास अधिकारी व्ही.के. पचारे यांनी जिल्हा परिषदेला पाठविला. पण जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी काहीच कारवाई केली नाही. शासकीय निधीचा अफरातफर करणे म्हणजे भादंविच्या कलम ४२० चा गुन्हा होतो. पण पोलीस ठाण्याला कुणीही तक्रार नोंदविली नाही. मागे आर्थिक अफरातफरीच्या बाबतीत मटाले ग्रामसेवकाबद्दल पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती व त्यांना तुरूंगाची हवासुद्धा खाली लागली होती. जिल्हा परिषद सदस्या प्रेमलता दमाहे यांनी जिल्हा परिषदेच्या सभेत या विषयावर प्रश्न उपस्थित केले होते. पण त्यांनाही प्रशासनाने सहकार्य केले नाही. १५ आॅगस्ट २०१४ रोजी ग्रामसभेत गावकऱ्यांनी जमा-खर्चाचा हिशेब मागितला. पण सदर ग्रामसेवकाने हिशेब दिला नाही. तेव्हा तीन तास ग्रामसेवक तावाडे यांना गावकऱ्यांनी खोलीत बंदिस्त करून ठेवले होते. मासिक बैठकीत किंवा ग्रामसभेत कोणतेही ठराव न करता मनमर्जी काम ग्रामसेवक करीत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तावाडे यांच्याकडे असलेल्या बोदलबोडी व लिंबा ग्रामपंचायतीचा कारभार तेथील नागरिकांच्या तक्रारीनुसार काढण्यात आला. परंतु एक वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन पाच तक्रारी गावकऱ्यांनी पंचायत समितीत केल्यावरही त्यांची बदली करण्यात येत नाही. यावरून कुठेतरी पाणी मुरत आहे, अशी चर्चा गावकऱ्यांत आहे. काही ग्रामसेवकांचे बदली आदेश काढण्यात आले.परंतु एकही ग्रामसेवकाच बदली आदेश काढण्यात आले. परंतु एकही ग्रामसेवक कहाली या ग्रामपंचायतीत रुजू झाला नाही. अधिकाऱ्यांनी फक्त गावकऱ्यांना भूलथापा देऊन वेळकाढू धोरण स्वीकारलेले आहे. म्हणूनच गावकऱ्यांनी ग्रामसेवकाला खोलीत बंदिस्त केल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. नवीन ग्रामसेवक कहाली येथे रुजू होत नसतील व ग्रामसेवक तावाडे यांची बदली होत नसेल तर पंचायत समितीचे प्रशासन किती ढिसाळ आहे व ग्रामसेवक अधिकाऱ्यांना ऐकत नाही, अशी अवस्था येथील पंचायत समितीची झाल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आश्रयच सदर ग्रामसेवकाला मिळून भ्रष्टाचाराला वाव मिळत आहे. तेव्हा आता तरी या ग्रामसेवकाची बदली होणार काय? असा प्रश्न गावकरी एकमेकांनाच विचारत असल्याचे चित्र दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)
१० लाखांची अफरातफरी चौकशीत उघड
By admin | Updated: December 3, 2014 22:52 IST