जमिनीची रजिस्ट्री जप्त : पोलीस कोठडीत २३ पर्यंत वाढगोंदिया : देवरी तहसील कार्यालयातील नाझर व अव्वल कारकून यांना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम व काही कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केले. मात्र या प्रकरणात नेमका कितीचा अपहार झाला यासंदर्भात निश्चीत माहिती सांगता येत नाही. देवरी तहसील कार्यालयाचे आॅडिट झाल्याशिवाय हा अपहार कितीचा झाला हे सांगता येत नसल्यामुळे पोलिसांचा पुढील तपास थांबला आहे.देवरी तहसील कार्यालयातील नाझर नामदेव शंकर बुटे व अव्वल कारकून सुनील खुशाल वैरागडे या दोघांना अटक करण्यात आली. देवरी पोलिसांनी या दोघांची चौकशी केल्यावर अव्वल कारकून सुनील वैरागडे याच्या घरी धाड घालून ७१ लाख ५० हजार रूपये ९.४५ वाजता जप्त केले. त्यानंतर तहसिल कार्यालयातील सुनील वैरागडे याच्या टेबलच्या ड्राव्हरमधून १४ हजार रूपये, व त्याच्या घरून ७ हजार ६०० रूपये जप्त करण्यात आले. नामदेव बुटे या नाझरकडून ४ लाख ५० हजार रूपये जप्त करण्यात आले. बुटे देवरी येथील पिंपळकर यांच्या घरी भाड्याने राहत होता. त्या घरमालकाला दोन लाख रूपये देऊन ठेवले होते. तर अडीच लाख रूपये देवरी येथील भाड्याच्या खोली शेजारी राहणाऱ्या श्रीमती मेश्राम यांना देऊन ठेवले होते. ही रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. या दोन्ही आरोपींच्या खात्यातून रक्कम काढली जाऊ नये यासाठी पोलिसांनी या दोन्ही आरोपींचे सर्वच खाते गोठविलेले आहेत.बुटे यांनी परभणी जिल्ह्याच्या पालम येथे ३५ गुंठे जमीन १ लाख ४० हजारात खरेदी करून ठेवली होती. त्या जमीनीची रजिस्ट्री चार दिवसांपुर्वी जप्त केली. याच दरम्यान त्यांनी ४ लाख ५० हजार रूपये किमतीची खरेदी केलेली स्कार्पिओ वाहन खरेदी केल्याचे सांगण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक पवार व त्यांच्या सोबत चार कर्मचारी मागील तीन दिवसांपासून रवाना झाले होते. या प्रकरणात आतापर्यंत घोळ कितीचा झाला याची माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. या आरोपींना न्यायालयाने १८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांनतर पुन्हा न्यायालयाने २३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तहसील कार्यालयाच्या आॅडिट रिपोर्ट येईपर्यंत देवरी पोलिसांचा तपास रेंगाळलेला राहणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
‘आॅडिट’ रिपोर्टमुळे अडला पोलिसांचा तपास
By admin | Updated: June 22, 2014 00:01 IST