बिरसी-फाटा : तिरोडा राज्य महामार्गाचे काम मागील २ वर्षांपासून सुरू आहे. मात्र, काम झालेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. अवघ्या ४ महिन्यांतच सिमेंट रस्त्यावर भेगा पडत असल्याने रस्त्याच्या कामाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्त्याचे भूमिपूजन होण्याआधीच रस्ता वादग्रस्त ठरला होता. अवैध उत्खननप्रकरणी बारब्रिक प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीवर (रायपूर) पाच कोटी रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत महामार्गाचे काम दोन टप्प्यात सुरू करण्यात आले. पहिला टप्पा मनसर- रामटेक-सालई खुर्द राज्य मार्ग क्रमांक-७५ चे ४४ किलोमीटर रस्ता काँक्रीटकरणासह दुपदरीकरण तसेच दुसरा टप्पा सालई खुर्द -तुमसर -तिरोडा काँक्रीटकरणासह दुपदरीकरण या ४३ किलोमीटर रस्त्याचे काम सुरू केले आहे. रस्ता तयार होतो न होतो तोच त्याला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या रस्त्याची गुणवत्ता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जवळपास २ वर्षांपासून मनसर-रामटेक ते तुमसर-तिरोडा या राज्य महागामार्गाचे काम सुरू आहे. कंत्राटदाराने रस्त्याचे काम सुरू करताना रस्ता संपूर्ण खोदला. त्यामुळे २ वर्षांपासून वाहनधारकांना या रस्त्यावरून ये-जा करताना धुळीचा त्रास सहन करावा लागला. या रस्ता बांधकामात कंत्राटदाराने मातीमिश्रीत रेती व निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरले तसेच सिमेंटचा वापरही केल्याचे बोलल्या जाते. त्यामुळे या संपूृर्ण रस्ता बांधकामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.