बोगस विद्यार्थी : ४९ शाळांत अव्यवस्थागोंदिया : शासकीय व अनुदानित आश्रमशाळांची अवस्था कशी आहे हे तपासणी करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने तपासणी पथक नेमले. जिल्ह्यातील अनेक आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी व व्यवस्थेची वाणवा असल्यामुळे बोगस विद्यार्थी शाळेत जमा करून तपासणीपूर्ती चांगली व्यवस्था करण्याचा आटापिटा संस्था संचालकांकडून केला जात आहे. जिल्ह्यात विशेष समाजकल्याण विभागातर्फे १० अनुदानित विमुक्त जाती भटक्या जमातीच्या आश्रमशाळा आहेत. तसेच देवरी प्रकल्प कार्यालयांतर्गत २६ खाजगी व १३ शासकीय आश्रमशाळा आहेत. खाजगी मधील सालेगाव येथील एक आश्रम शाळा तर कोरंभी येथील शासकीय आश्रम शाळा बंद आहे. जिल्ह्यातील आश्रम शाळांत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र येथील व्यवस्था शासनाच्या नियमाप्रमाणे पूरविली जात नसल्याने अनेकदा आश्रम शाळाविरोधात आवाज उठविला जातो. आश्रम शाळातील आदिवासी विद्यार्थ्यांना सर्पदंश, आजार, विषबाधा, दूषित पाणी, निकृष्ट आहार व पुरेशा सोयी सुविधा अभावी कित्येक विद्यार्थ्यांचा मृत्यू होतो. आश्रम शाळांमध्ये शाळा संहितेचे पालन होत नाही, सानुग्रह अनुदान मिळूनही विद्यार्थ्यांना सोयी सुविधा दिल्या जात नाही. आश्रमशाळांमध्ये पिण्याचे पाणी, पोषण आहार, स्वच्छता व मूलभूत सुविधांचा अभाव आहे. सर्व सुविधा कागदावर दाखवून उत्तम व्यवस्थेचा अहवाल शासनाला सादर केला जातो. यासाठी आश्रम शाळांची तपासणी करण्यासाठी महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ही समिती आश्रमशाळांची तपासणी करणार असल्याने आश्रमशाळांच्या संचालकांनी आपल्या शाळातील विद्यार्थ्यांची पटसंख्या पुरेशी आहे. हे दाखविण्यासाठी बोगस विद्यार्थ्यांना आणून काही आश्रमशाळांमध्ये बसविण्यात आल्याची माहिती आहे. बोगस विद्यार्थ्यांचा उपस्थितीत आपल्या आश्रम शाळांची तपासणी करवून घेण्याची शक्कल काही संस्था संचालकांनी व व्यवस्थापकांनी लढविली आहे. शासन देत असलेल्या अनुदानापैकी खूप कमी रक्कम विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी खर्च केली जाते. विद्यार्थ्यांना फळे, दूध कधीच मिळत नाही. भात, भाजी, पोळी देण्याचे प्रावधान आहे. मात्र विद्यार्थ्यांना पोळी कधीच दिसत नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र ताट, स्वतंत्र आंथरून, पांघरून द्यायची असते. मात्र आंथरुन, पांघरूनची व्यवस्था अनेक आश्रम शाळांमध्ये नाही. २० विद्यार्थ्यांमागे एक शौचालय, बाथरूम असायला हवे, परंतु अशी सोय जिल्ह्यातील अनेक आश्रमशाळांमध्ये नाही. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सायंकाळी लाईटची व्यवस्था आवश्यक आहे. अनेकदा विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास विद्यार्थ्यांना अंधारात रहावे लागते. अनेक आश्रम शाळांमध्ये जनरेटर आणून ठेवले आहेत. मात्र ते जनरेटर फक्त शोभेची वस्तू होऊन बसले आहेत. तपासणी करणाऱ्या चमूने बारीक गोष्टीचे निरीक्षण केल्यास आश्रमशाळांमधील घबाड पुढे येईल. (तालुका प्रतिनिधी)
आश्रमशाळांच्या तपासणीचा धसका
By admin | Updated: August 4, 2014 23:49 IST