आॅनलाईन लोकमतगोंदिया : जिद्द व चिकाटीला परिश्रमाची जोड मिळाली तर कोणत्याही क्षेत्रात महिला यशस्वी होवू शकतात. ही बाब आमगाव तालुक्याच्या बिरसी येथील एकाच ‘इंदिरा गांधी स्वयंसहायता महिला बचत गटा’तील तीन महिलांनी सिद्ध करून दाखविली. त्यांच्या कर्तृत्वामुळेच सदर गटाला उत्कृष्ट महिला बचत गट म्हणून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत तेजस्विनी महाराष्टÑ ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत स्वावलंबन लोकसंचालित साधन केंद्र आमगावद्वारे स्थापित बिरसी येथील इंदिरा गांधी महिला बचत गटात एकूण १३ सभासद आहेत. गटाची स्थापना १३ डिसेंबर २००९ रोजी झाली. गटाच्या स्थापनेपासूनच सीएमआरसी व सहयोगिनी यांच्या गटाला नियमित भेटी देत होत्या. त्यांच्या माध्यमातून मिळणारे प्रशिक्षण व मार्गदर्शनामुळे सर्व सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गटामध्ये कोणतेही निर्णय घ्यायचे असल्यास सर्वानुमते चर्चा करूनच घेतले जातात.इंदिरा बचत गटाचा नियमित व्यवहार तपासून वैनगंगा ग्रामीण बँक आमगावने अवघ्या सहा महिन्यांतच गटाला २५ हजार रूपयांचा कर्ज दिले. नंतर ५० हजार व त्यानंतर एक लाख रूपयांचा कर्ज दिले. गटाच्या मागणीनुसार कर्जामध्ये वाढ करून दिली.विविध प्रशिक्षण व मार्गदर्शनामुळे गटाने व्यवसाय करण्याची तयारी दाखविली. सुरूवातीला गटातील तीन महिलांनी व्यवसायाला सुरूवात केली. आयसीआयसीआय बँकेने प्रथम एक लाख ५० हजार रूपये, दुसºयांदा तीन लाख रूपये व तिसºयांदा पाच लाख रूपयांचा कर्ज गटाला दिले. असे एकूण ११ लाख २५ हजार रूपयांचा कर्ज गटाला उपलब्ध झाले. गटातील तीन महिलांनी अगरबत्ती मशीन खरेदी केली व व्यवसाय सुरू केला. एका महिलेने ७० हजार रूपयांची झेरॉक्स मशीन खरेदी केली. तर एका महिलेने कापड व मनिहारी दुकान थाटले. या सर्व महिलांना दरवर्षी ५० ते ६० हजार रूपयांचा निव्वळ नफा मिळत आहे.विशेष म्हणजे या महिलांचे काम व प्रगती बघून गटातील इतर महिलासुद्धा व्यवसायाकडे वळल्या. आज त्या महिला शेळीपालन, शिवणकाम व शेतीवर आधारित उद्योग करीत आहेत. जणू या गटातील महिलांमध्ये व्यवसायाची कल्पना व परिश्रम घेण्याची जिद्द एकमेकींपासूनच निर्माण झाली आहे. सदर गटाचा उत्साह, महिलांची व्यवसाय करण्याची जिद्द व गटाचे व्यवहार बघून १३ जून २०१७ रोजी स्वावलंबन लोकसंचालित साधन केंद्राच्या वतीने आमदार संजय पुराम यांच्या हस्ते उत्कृष्ट महिला बचत गट म्हणून इंदिरा गटाला प्रथम पुरस्कार देण्यात आला.
महिलांच्या कर्तृत्वाने ‘इंदिरा’ गट प्रगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 22:11 IST
जिद्द व चिकाटीला परिश्रमाची जोड मिळाली तर कोणत्याही क्षेत्रात महिला यशस्वी होवू शकतात. ही बाब आमगाव तालुक्याच्या बिरसी येथील एकाच ‘इंदिरा गांधी स्वयंसहायता महिला बचत गटा’तील तीन महिलांनी सिद्ध करून दाखविली.
महिलांच्या कर्तृत्वाने ‘इंदिरा’ गट प्रगत
ठळक मुद्देइतर महिलाही वळल्या व्यवसायाकडे : मार्गदर्शनातून मिळाली प्रेरणा