अरविंद शिवणकर : खेळांनी विद्यार्थ्यांचे जीवन फुलते बोंडगावदेवी : शरीर स्वास्थ्यासाठी मैदानी खेळांचा परिपाठ विद्यार्थ्यांना आवश्यक आहे. आपल्या शरीर संरचनेची वाढ होण्याबरोबरच मानवी जीवनात शिस्त, धैर्य, साहस, आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वदेशी खेळांची आवड निर्माण होणे गरजेचे आहे. स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाचे क्रीडामहोत्सवांनी शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या कौतुकामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची संधी मिळते. स्वदेशी मंडळाला ग्रामस्थांनी भरभरुन मदत करण्यासाठी पुढे येण्याची प्रवृत्ती पूर्वी दिसत होती. आज मात्र क्रीडा महोत्सव घेण्यासाठी आयोजकांची उणीव भासत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाबरोबरच साहस, शिस्त, धाडस अवगत करण्यासाठी स्वदेशी खेळ टिकवून ठेवणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पं.स. सभापती अरविंद शिवणकर यांनी केले. स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ जि.प. गोंदिया, पं.स. अर्जुनी मोरगाव अंतर्गत बाक्टी केंद्रस्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. येरंडी-विहीरगाव येथील जि.प. प्राथमिक शाळेच्या क्रीडांगणावर आयोजित तीन दिवसीय केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प. सदस्य तथा डॉ. आंबेडकर समाजभूषण डॉ. गोविंदा मेश्राम होते. पं.स. सभापती अरविंद शिवणकर यांच्या हस्ते बजरंगबलीच्या प्रतिमेचे पूजन करुन व स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाचे ध्वज फडकावून विधीवत उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच कमला कोरे, पं.स. सदस्य पिंगला ब्राम्हणकर, गटशिक्षणाधिकारी टी.बी. भेंडारकर, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अहिल्या खोब्रागडे, प्राचार्य हेमंत राजगिरे, चान्ना सरपंच मोरेश्वर सोनवाने, माजी सरपंच जगन्नाथ बारसे, अभियंता टी.पी. कचरे, सावरटोलाचे सरपंच वैशाली राखडे, हिवराज पाऊलझगडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. क्रीडा महोत्सवात सहभागी झालेल्या खेळाडूंनी पाहुण्यांना मानवंदना दिली. सदर क्रीडा महोत्सवात १२ शाळेतील ५०० विद्यार्थी, ५० शिक्षक सहभागी झाले आहेत. ग्रामवासीयांकडून सहा जेवनाची व्यवस्था करण्यात आली आहे.या वेळी सभापती शिवणकर म्हणाले, विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास खेळांनी घडतो. गावाच्या सहकार्याने होणाऱ्या क्रीडा महोत्सवात आपुलकीची भावना निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. गटशिक्षणाधिकारी भेंडारकर यांनी, क्रीडासत्र खेळी-मेळीच्या वातावरणात पार पडावे अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. गोविंदा मेश्राम यांनी मैदानी खेळातून साहसी, शिस्तप्रिय विद्यार्थी घडून प्रगती गाठण्यास मदत होत असल्याचे सांगितले. संचालन मंडळाचे सचिव पी.एम. लेंडे यांनी केले. प्रास्ताविक येरंडी शाळेचे मुख्याध्यापक पी.व्ही.सोनवाने यांनी मांडले. आभार प्रकाश मोहबंशी यांनी मानले. (वार्ताहर)
स्वदेशी खेळांनी आत्मविश्वास वाढतो
By admin | Updated: December 29, 2016 01:13 IST