गोंदिया : शिक्षण घेताना लागलेल्या वाईट सवयींची पूर्तता करण्यासाठी तरूण पैसे कमविण्याचा नाद धरू लागले. परंतु मेहनत करण्यापेक्षा सहजरीत्या अधिक पैसे कसे मिळतील याचा ध्यास धरणाऱ्या तरूणांनी लुटण्याचा गोरखधंदा स्वीकारला. यामुळेच हल्ली आमगाव गुन्हेगारीने धगधगू लागले आहे.गोंदियाच्या श्रीनगरातील यशवंतराव तिडके (४२) हे स्पेअर पार्टसचे व्यापारी आहेत. आमगावातील आॅटो स्पेअर्स पार्टच्या दुकानदारांना दिलेल्या साहित्याची वसूली करण्यासाठी १ आॅगस्ट २०१४ रोजी ते आमगावला गेले. याच दिवशी आमगावातील चार तरूणांनी बसस्थानकावरील चंद्राबार येथे मद्यप्राशन करून जेवण केले. त्यात लूटपाट करून पैसा कमवू असा प्लान त्या चौघांपैकी एक असलेल्या पोलीस हवालदाराच्या सैन्यात असलेल्या जवानाने केला. जेवण केल्यावर ते चौघेही आंबेडकर चौकात आले. त्यावेळी यशवंतराव एका दुकानातून पैसे वसुली करीत होते. या चौघांची नजर त्यांच्यावर गेली. त्यांनी याला गंडविण्याचा चंग बांधला. या चौघांपैकी दोन तरूण एका वाहनाने किडंगीपारच्या चौकीवर जाऊन थांबले. तर दोघेजण एका वाहनाने त्यांच्यावर दुरून नजर ठेवीत होते. सायंकाळ होताच गोळा झालेले दीड लाख रूपये घेऊन यशवंतराव आपल्या मोटारसायकलने गोंदियाला जाण्यासाठी निघाले असताना त्याच्यावर नजर ठेवलेल्या दोघांनी मागून पांढऱ्या रंगाच्या विना क्रमांकाच्या मोटारसायकलने त्यांचा पाठलाग केला.किंडगीपार चौकीवर असलेल्या त्या दोन मित्रांना पाठलाग करणाऱ्यांनी किंडगीपार चौकीवरून परत आमगावला पाठविले. यशवंतरावचे वाहन ठाणा ते दहेगावच्या दरम्यान जंगल परिसरात जाताच या पाठलाग करणाऱ्या आरोपींनी त्यांना ओव्हरटेक करून पिस्टल दाखविली. यामुळे त्यांनी वाहन थांबविले. त्यांच्या वाहनाची किल्ली पकडून धमकी देत त्यांची पैशांची बॅग हिसकावली. नंतर ते परत ठाणा मार्गे गोरेगावला निघून गेले. गोरेगाव येथे त्यांनी मोटारसायकलमध्ये पेट्रोल टाकले नंतर ते मुंडीपारमार्गे मांडोबाईकडे निघाले. परंतु मांडोबाईच्या जंगल परिसरात त्यांच्या वाहनाचे पेट्रोल संपल्याने या दोघांनी किडंगीपार चौकीवरून आमगावला परत पाठविणाऱ्या दोघांना पेट्रोल घेऊन बोलावले. पेट्रोल घेऊन आलेल्या साथीदारांना त्यांनी प्रत्येकी १० हजार रूपये देऊन उर्वरित रक्कम आपसात त्या दोघांनी वाटून घेतली. आमगाव पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस हवालदाराचा मुलगा भारतीय सैन्यात कार्यरत आहे. त्याला नोकरीत रस नसल्याचे आपल्या साथीदारांना सांगत लुटपाट करण्यातून अधिक पैसे कमवू असे त्याने सर्वाना सांगितले होते. मांडोबाईच्या जंगलात पैश्याची वाटणी केल्यावर ती बॅग त्या ठिकाणी फेकून देण्यात आली. या प्रकरणात त्या चौघांवर आमगाव पोलिसांनी भादंविच्या कलम ३९२, ३४, भारतीय हत्यार कायदाचे कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना, उपविभागीय अधिकारी अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बी.डी. मडावी यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार, विनोद बरैय्या, खेमराज खोब्रागडे, लिलेंद्र बैस, रवी खिराडे व हवालदार राऊत यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
आमगावात वाढतेय सुशिक्षित गुन्हेगारी
By admin | Updated: October 27, 2014 22:37 IST