वाहन चालविण्यासाठी कायद्याने काही महत्त्वाचे नियम घालून दिले आहेत. घालून दिलेल्या नियमांकडे दुर्लक्ष करून सध्या दुचाकी गाडी चालविणाऱ्या तरुण वर्गामध्ये मोबाइलवर संभाषण करण्याच्या सवयी वाढल्या आहेत. या बोलण्याला तरुण वर्ग स्टाइल समजत आहेत. ही स्टाइल मृगजळासारखी असून, कोणत्या बाजूने वाहन येईल, याची काही निश्चितता राहत नाही. असे प्रकार कित्येकदा पोलिसांच्या नजरेसमोरही घडत असतात; परंतु त्याची थातुरमातुर कारवाई केव्हाही जीव घेणे ठरू शकते. हा प्रकार थांबविण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पोलिसांनी योग्य पद्धतीने कारवाई केल्यास निदान अपघात होण्यापासून टाळले जावू शकते. तरुण वर्गामध्ये स्मार्ट फोन वापरुन स्मार्ट होणे चांगली बाब असली तरीही अपडेट माहितीसाठी फक्त त्याचा वापर होणे गरजेचे आहे. त्याचा दुरुपयोग करून अपघाताला आमंत्रण देण्यात काही उपयोग नाही. ही भावना तरुण मंडळीच्या मनात रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्ताने रुजविणे गरजेचे आहे. असे झाले नाही तर गाडी चालविणे आणि मोबाइलवर बोलणे जीवघेणे ठरल्याशिवाय राहणार नाही. सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा पंधरवड्यादरम्यान पोलिसांकडून समुपदेशन झाल्यास फायद्याचे ठरेल, असे वाटते.
वाहन चालविताना मोबाइलवर बोलण्याची वाढली क्रेझ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:53 IST