गोंदिया : आमगाव-देवरी-सालेकसा हा तालुका नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल असला तरी या तालुक्याला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे आपले स्वप्न आहे. त्यासाठी सर्वात आधी शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सुविधा वाढविण्यावर आपला भर राहणार असल्याचे आ.संजय पुराम यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आ.पुराम यांनी लोकमतच्या गोंदिया जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री बाळा अंजनकर उपस्थित होते.आपल्या विधानसभा क्षेत्रातील विकासाचा आराखडा आणि आगामी संकल्प याबद्दल सांगताना आ.पुराम म्हणाले की, ८० टक्केपेक्षा कमी वनक्षेत्र असेल त्या परिसरात सिंचनासाठी मध्यम प्रकल्प मंजूर करण्यासाठी आपण प्रयत्नशिल राहणार आहे. सध्या सिंचन सुविधा पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी धानपिक घेता येत नाही. त्यामुळे बारमाही सिंचनाचे क्षेत्र ५० ते ५५ टक्क्यांपेक्षा जास्त नेण्यावर आपला भर राहणार आहे.मानागड या मध्यम प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र कालव्यांच्या कामासाठी निधीची गरज आहे. याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा झाली आहे. कालव्यांच्या कामासाठी लवकरच ८ कोटींचा निधी मिळणार असून त्यामुळे सालेकसा तालुक्यातील आदिवासीबहुल भागात सिंचनाचे क्षेत्र वाढेल, असा विश्वास पुराम यांनी व्यक्त केला.राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या देवरीत ‘एमआयडीसी’ला मंजुरी मिळावी आणि त्यातून येथे छोटे-मोठे उद्योग उभारले जावे, त्यातून बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठीही आपले प्रयत्न राहणार असल्याचे पुराम यांनी सांगितले.शाळ भेटीतून विद्यार्थ्यांशी संवादविद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे त्यांच्यावर चांगले संस्कार झाले तर उद्याची पिढी संस्कारक्षम होईल असा विचार करून आ.संजय पुराम सध्या कोणत्याही शाळेला अचानक भेट देऊन थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थ्यांना स्वच्छता, आरोग्य, व्यसनमुक्ती यासह मोबाईलचा होत असलेला अतिरेक यावरही ते प्रबोधन करीत आहेत. आपला हा संवाद सुरूच राहणार असल्याचे आ.पुराम यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
सिंचनक्षेत्र वाढविण्यावर भर
By admin | Updated: February 7, 2015 00:56 IST