आमगाव : शहरातील पाणीपुरवठा मागील १५ दिवसापासून बंद आहे. तो सुरळीत सुरु करावा तसेच रेल्वे स्टेशन ते वाघनदी पर्यंत नाली व रस्ता बांधकाम कासवगतीने सुरु आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या समस्या त्वरित मार्गी लावण्याची मागणी शहरवासीयांनी तहसीलदार दयाराम भोयर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
मागील चार महिन्यांपासून आमगाव नगरामध्ये मेनरोड वरील नाली व रस्ता बांधकामाचे मंदगतीने सुरु आहे. गावातील मुख्य मार्गावर मेन रोडवर असल्यामुळे सालेकसा, लांजी, बालाघाट व अन्य भागात येणारी जाणारी वाहतूक या मुख्य मार्गावरुन होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत असून असंतोष निर्माण झाला आहे. उन्हाळ्याला सुरुवात झाली असून शहरात पिण्याच्या टंचाई सुरु झाली. नळ योजनेची पाईपलाईन वारंवार फुटत आहे. यामुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन या संकटातून बाहेर करण्यात अशी मागणी निवेदनातून केली. शिष्टमंडळात तालुका अध्यक्ष काशीराम हुकरे, महामंत्री नरेंद्र बाजपेयी, राजेंद्र पटले, राकेश शेंडे, हरिहर मानकर, पिंटू अग्रवाल, कृष्णा चुटे,मनोज सोमवंशी,ताराचंद खोब्रागडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.