इंदोरा (बुज.) : तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम करटी बु. येथे अवैध दारू विक्रीला उधान आले असून दारूचा व्यवसाय खूप फोफावला आहे. मात्र याकडे पोलीस विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे येथील महिलांद्वारे बोलल्या जात आहे. वरिष्ठांनी अवैध दारू विक्रीला आळा घालावा, अशी मागणी महिलांकडून केली जात आहे.करटी बु. गावात अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री सुरू आहे. दारूबंदी करणाऱ्यांसाठी येथील महिला एकत्रित होऊन ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव पारित करण्यात आला. तत्कालिन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश पटले यांनीसुद्धा महिलांना सोबत घेवून दारूबंदी केली. परंतु काही दिवसातच दारू विक्रेत्यांनी महिलांना शिवीगाळ करुन व वेळोवेळी अपमानित करुन पुन्हा दारू विक्रीला सुरुवात केली. येथील चौकात किराणा, घरगुती साहित्य व भाजीपाला विक्रीचे दुकान आहेत. महिला या ठिकाणी खरेदीसाठी येतात. याच रस्त्यांवरुन महिला शौचासाठी जातात. त्यावेळी याच चौकात दारू पिणाऱ्यांचा धिंगाणा सुरू असतो. त्यामुळे महिला व सभ्य पुरुषांनासुद्धा त्यांच्यापासून त्रास होतो. बाहेर गावून येणारे लोक खूप दारू ढोसतात व कधीकधी रस्त्याच्या बाजूला पडून राहतात व शिव्या देतात. त्यामुळे महिला, मुली व विद्यार्थ्यांना मोठाच त्रास सहन करावा लागतो.करटी गाव लोकसंख्येने मोठे आहे. या गावात प्राथमिकपासून तर माध्यमिकपर्यंत शाळा आहेत. रस्त्यावर बँकसुद्धा आहेत. या ठिकाणी दररोज येणाऱ्या-जाणाऱ्या महिला-पुरुषांची, विद्यार्थी-विद्यार्थिनींची ये-जा असते. मात्र शाळा सुटण्याच्या वेळेसही दारू पिणाऱ्याची वर्दळ असते. याचा त्यांना त्रास होतो.दारूळ्यांमुळे गावात अशांतता पसरली असून अनेक धोकादायक प्रसंग उद्भवू शकतात. दारू विक्रेत्यांवर पोलीस विभागाचे लक्ष नसल्यामुळे ते खुलेआम अवैध दारू विक्री करतात. एखाद्या महिलेने म्हटले तर सर्रास म्हणतात की आम्ही पोलिसांना ‘मंथली’ देतो, तुम्ही आमचे काय करुन घ्याल? शिवाय महिलांना धमकीसुद्धा देण्यात येते. त्यामुळे कोणतीही महिला समोर येवून विरोध करायला तयार नाही. तेव्हा पोलीस प्रशासनाने करटी बु. येथील अवैध दारू विक्रीवर बंदी घालून गावामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, अशी आग्रही मागणी करटी बु. येथील महिला व नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
अवैध दारू विक्रीला उधाण
By admin | Updated: February 8, 2015 23:34 IST