गोंदिया : दारुच्या अवैध विक्रीवर रोख लावण्यासाठी राज्य सरकारने उत्पादन शुल्क विभाग स्थापन केला. दारुच्या अवैध विक्रीवर रोख लावून नियमानुसार होणाऱ्या दारु विक्रीच्या माध्यमातून शासनाला उत्पन्न मिळवून देणे हे देखील या विभागाचे काम आहे. गोंदिया व देवरी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे. मात्र, परवानाधारक दारु विक्रेत्यांकडून शासकीय नियमांचे उल्लंघन होणे ही नित्याचीच बाबा झाली आहे. शासनातर्फे परवाना धारक वाईन शॉप, देशी दारु दुकान व बीअर बार सुरू करण्याचे तसेच बंद करण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे. वाईन शॉप सकाळी १० ते रात्री ९.३० पर्यंत, बीअर बार सकाळी १० ते रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याचा नियम आहे. असे असतानाही देशी दारुची दुकाने सकाळी १० ऐवजी ७ वाजताच उघडतात व मध्यरात्रीपर्यंत सुरू असतात. हेच चित्र बिअर बारच्या बाबतीतही पाहायला मिळते. येथे रात्री उशिरापर्यंत मद्यविक्री सुरू असते. या सर्व बाबींची माहिती असतानाही उत्पादन शुल्क विभाग कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही. यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बिअर बारमध्ये बॉटलवर मुद्रित किंमतीपेक्षा जास्त दराता विक्री केली जाते. या अतिरिक्त शुल्कावर शासनाला कुठलाही अतिरिक्त महसुल मिळत नाही. उत्पादन शुल्क विभागाच्या देवरी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात देवरी, आमगांव, सालेकसा व अर्जुनी मोरगांव तालुका आणि गोंदिया कार्यालयांतर्गत गोरेगांव, गोंदिया, तिरोडा व सडक अर्जुनी तालुक्यांचा समावेश आहे. उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे एकीकडे नियमांचे उल्लंघन होत असून दुसरीकडे शासनाचा महसुलही बुडत आहे. जिल्ह्यात देशी दारुशिवाय मोह फुल व हातभट्टीची दारु देखील खुलेआम विकल्या जात आहे. दररोज कोणत्या ना गावात पोलीस धाड टाकून अवैध दारु पकडत आहेत. यावरून जिल्ह्यात किती मोठ्या प्रमाणात दारुची अवैध विक्री सुरू असल्याचे स्पष्ट होते. पोलिसांना जे दिसते ते उत्पादन शुल्क विभागाला का दिसत नाही, संबंधित विभाग का कारवाई करीत नाही, असे एक ना अने प्रश्न उपस्थित झाले आहेत. (प्रतिनिधी)
अवैध दारुविक्री जोरात
By admin | Updated: January 20, 2015 22:38 IST