गोंदिया : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिलासादायक चित्र जिल्ह्यात आहे. गुरुवारी जिल्ह्यात ९ बाधितांनी कोरोनावर मात केली तर, १० नवीन बाधितांची भर पडली. बाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १०३ वर आली आहे.
गुरुवारी जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक सात रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तर तिरोडा तालुक्यात दोन आणि बाहेरील राज्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख सातत्याने खाली येत असल्याने सहा तालुके कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहेत. तर सालेकसा तालुक्यात सद्यस्थितीत एकही रुग्ण नसल्याने हा तालुका कोरोनामुक्त झाला आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ६६,१८२ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ५४,५५८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केली जात असून, यातंर्गत ६५,७८६ नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ५९,६७३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४,२२३ कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी १३,९३७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत १०३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ७ स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.