जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे यांनी शनिवारी (दि.२६) चार डॉक्टर आणि सहा अधिपरिचारिकांच्या नागपूर जिल्ह्यात प्रतिनियुक्तीचे आदेश काढले आहेत. त्यात अर्जुनी मोरगाव, देवरी, सडक अर्जुनी तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. तर ग्रामीण भागात काेरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. तर कोरोना लसीकरण सुरू आहे. यासाठी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र असे असताना जिल्हा शल्यचिकित्सकांनी जिल्ह्यातील डॉक्टर आणि अधिपरिचारिकांना नागपूर येथे प्रतिनियुक्तीवर पाठविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सलाईनवर आली असून याचा कोविड लसीकरणावरसुध्दा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांवरील ताण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
..........
अर्धा स्टॉफ नागपूर तर अर्धा गोंदियात
जिल्ह्यातील अतिदुर्गम व आदिवासी बहुुल समजल्या जाणाऱ्या चिचगड आणि अर्जुनी मोरगाव, सौदंड येथील रुग्णालयाचा अर्धा स्टॉफ सध्या गोंदिया तर अर्धा स्टॉफ नागपूर येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आल्याची माहिती आहे. अशातच या तिन्ही तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून तेथील रुग्णालयात काय स्थिती असेल याची कल्पना न केलेलीच बरी अशी स्थिती आहे.
................
ग्रामीण भागात कोरोनाला रोखणार कसे
कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेऊन शासनाने आरोग्य विभागाला यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहे. अशात आता ग्रामीण भागातील डॉक्टर आणि परिचारिकांना प्रतिनियुक्तीवर बाहेर पाठविले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक झाल्यास तेथील परिस्थिती रोखणार कशी असा सवाल उपस्थित केला जात आहे.