आमगाव : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या आमगावसह रिसामा ग्रामपंचायतला एकत्रितपणे शासनाने नगर परिषद म्हणून जाहीर करावे, या मागणीसाठी आता रिसाम्यातील नागरिकांनी लढा सुरू केला आहे. ग्रामपंचायतने मासिक सभेत घेतलेला न.प.विरोधी ठराव धुडकावत ग्रामसभेने नगर परिषदेच्या मागणीचा ठराव सोमवारी संमत केला.राज्य शासनाने राज्यातील एकूण १३८ ग्राम पंचायतींना नगर पंचायतचा दर्जा बहाल करून तशी घोषणा केली. यात आमगाव ग्रामपंचायतचा समावेश आहे. परंतु आमगाव ग्रामपंचायत सीमांकनात एकवटलेल्या रिसामा, बनगाव, किडंगीपार, पदमपूर व माल्ही ग्रामपंचायत मिळून नगर पंचायतऐवजी नगर परिषद मिळावी यासाठी काही राजकीय पुढारी शासन स्तरावर प्रयत्न करीत आहेत. परंतु काही संधीसाधू पुढारी नगर परिषदेच्या मागणीला सतत विरोध करीत आहेत. त्यामुळे आमगावसह इतर ग्रामपंचायतमध्ये पेच निर्माण झाला आहे. शासनाने नगर पंचायतऐवजी नगर परिषदेच्या मागणीसाठी पुढाकार घेत यासाठी प्रशासकीय कारवाई सुरू केली. नगर परिषद हवी असलेल्या ग्रामपंचायतींना तसा ठराव संमत करून सादर करण्याकरिता पत्रव्यवहार केला. शासनाच्या या सार्थक पावलाकडे काही राजकीय पुढाऱ्यांनी विरोधात्मक भूमिका घेतली आहे. यात सदस्यांवर दडपण घालून नगर परिषदविरोधी ठराव संमत करण्यात आला. त्यामुळे ग्रामपंचायतविरूध्द नागरिक असा संघर्ष सुरू आहे.आमगाव ग्रामपंचायतसह रिसामा, बनगाव, पदमपूर, कुंभारटोली, किंडगीपार व माल्ही हे गाव भौगोलिक सिमांकनात एकवटलेले आहेत. या ग्रामपंचायतींना आमगाव नगर परिषदेत समायोचित करून विकासात्मक पाऊल टाकण्याचे प्रयत्न समोर आहेत. परंतु राजकीय विरोधापुढे नगर परिषद मिळविण्याचे स्वप्न मागे पडत आहे. रिसामा ग्रामपंचायतने प्रस्तावित आमगाव नगर परिषदेत समाविष्ठ होऊ नये यासाठी ३० डिसेंबर २०१४ ला ठराव घेतला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला होते. नागरिकांनी या संदर्भात विशेष ग्रामसभेची मागणी केली. त्यानुसार जगदीश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन बहुमताने नगर परिषदेच्या मागणीचा ठराव संमत केला. यावेळी रवी क्षिरसागर, महेश उके, रवि अग्रवाल, रामेश्वर श्यामकुवर यांनी मार्गदर्शन केले. (शहर प्रतिनिधी)
रिसामातील नागरिकांना हवी नगर परिषद
By admin | Updated: February 18, 2015 01:32 IST