सडक/अर्जुनी : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी असलेल्या आरोग्य सेवकांनी सडक/अर्जुनी तालुक्यात भेटी दिल्या नाही. परिणामी आरोग्य व्यवस्था कोलमडल्याने चित्र पाहावयास मिळत आहे. जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत सडक/अर्जुनी तालुक्यात जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एम.पी.डब्ल्यू. कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे. दर १५ दिवसांनी प्रत्येक घरी जाऊन कुटूंबाची आरोग्य विषयक माहिती घेऊन घरातील सांडपाणी आदी समस्येविषय माहिती आरोग्य सेवकाकडून घेतली जाते. आरोग्यासंदर्भात प्रत्येक कुटूंबाला योग्य सल्ला देण्याची जबाबदारी सर्वच एमपीडब्ल्यू या कर्मचार्यांवर दिली आहे. गावातील कोणत्या वार्डात कुठले आजार तर नाही ना याचीही माहिती एमपीडब्ल्यू च्या माध्यमातून वरिष्ठ कर्मचारी अधिकार्यांना पाठवावी लागते. पण स्थानिक एमपीडब्ल्यू हे कर्मचारी पाच महिने जर त्या कुटूंबाना भेटी देत नसतील तेथील आरोग्य व्यवस्था कशी असेल यावरून कळत आहे. सडक/अर्जुनी शहरातील एमपीडब्ल्यू हे गेल्या पाच महिन्यांपासून कुटुंबांना भेटी दिले नसल्याचे चित्र आहे. सडक/अर्जुनी शहराच्या ठिकाणी आरोग्य सेवकाचा असा हलगर्जीपणा असेल तर पांढरी, हेटी, कोकणा/जमीदारी, जांभळी, कनेरी, मोगरा, पुतळी, पिपरी, दोडके या गावातील परिस्थीती काय असेल या बाबत न बोलले बरे. अशा निष्काळजीपणे काम करणार्या कर्मचार्यांवर नजर ठेवण्यासाठी पर्यवेक्षक, वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी आदीची नियुक्ती केली आहे. पण त्या कर्मचार्यांत कुठलीही सुधारणा होत नाही. सध्या पावसाळा सुरू होण्यासाठी काही दिवस उरले आहेत. त्यासाठी आरोग्य विभागाने जातीने लक्ष देऊन तालुक्याचे नियोजन करून कुठेही मलेरिया, डेंग्यूसारखे आजार होऊ नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. या नियोजनासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी गहलोत यांनीही लक्ष देण्याची गरज आहे. मागील वर्षी या आरोग्य विभागाच बेजबाबदार व निष्काळजीपणामुळे सौंदड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पिपरी व राका या गावातील दोन व्यक्तींना आपल्या जीव गमवावा लागला, अशी वेळ यावर्षी येणार नाही. याबाबी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लक्ष देण्याची नितांत गरज आहे. (शहर प्रतिनिधी)