लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : घरगुती गॅस वापरताना निष्काळजीपणा केल्याने दुर्घटनांना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा आपल्या कानावर येत असते की, गॅस लिक झाला किंवा गॅस लिक झाल्यानंतर व्यवस्थित खबरदारी घेतली नाही म्हणून गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. अनेकदा फक्त व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे सिलिंडरचे स्फोट घडून येतात. यामध्ये अनेक लोकांना आपला जीव नाहक गमवावा लागतो.
गृहिणींनी गॅस सिलिंडर घरी आल्यानंतर वापरायची एक्सपायरी डेट तपासावी, सिलिंडर नेहमी सरळ उभा ठेवावा, उष्णता निर्माण करणारी उपकरणे ठेवू नयेत, रात्री काम संपल्यावर किंवा बाहेर जाताना सिलिंडरची कॅप फिरवून गॅस बंद करावा. नियमित दक्षता आणि काळजी घेतल्यास होणाऱ्या अपघातांपासून बचाव होऊ शकतो.
एलपीजी इन्शुरन्स कव्हरमध्ये ५० लाख रुपयांपर्यंतचा विमा काढला जातो. दुर्घटना झाल्याच्या ३० दिवसांमध्ये ग्राहकाने डिस्ट्रिब्युटर आणि जवळच्या पोलिस ठाण्यामध्ये सूचना देणे गरजेचे आहे.
गॅस लिक झाल्यास काय काळजी घ्याल? गॅस सिलिंडर आणि गॅसचा पाइप यांची नियमित तपासणी करा. कंपनीच्या अधिकृत कर्मचाऱ्यांकडून तपासणी करून घ्या, चांगले सुरक्षा पाइप वापरा, गॅसगळती झाल्यास दारे-खिडक्या उघडा, ट्यूबलाइट सुरू करू नका, गॅसचा वास येत असल्यास काडेपेटी, लायटर, सिगारेट वापरू नका, मेणबत्ती सुरू असेल तर तत्काळ विझवा, रेग्युलेटरचे स्वीच बंद करा, गॅस कंपनीच्या माणसाला तत्काळ फोन करा.
क्लेमसाठी काय कराल?दुर्घटना झाल्याच्या ३० दिवसांमध्ये ग्राहकाने ड्रिस्ट्रिब्युटर आणि जवळच्या पोलिस ठाण्यामध्ये या दुर्घटनेची सूचना देणे गरजेचे आहे. ग्राहकाला एफआयआरची कॉपी दाखविणे गरजेचे आहे. क्लेम करताना पोलिस ठाण्यामध्ये रजिस्टर्ड एफआयआरच्या कॉपीसह मेडिकल रिसिष्ठ, रुग्णालयाचे बिल, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे.
आग लागली तर... सिलिंडर लिकेज होऊन आग लागल्याने मोठा अपघात घडू शकतो. यावेळी प्राथमिक उपाय करून जीवित हानी टाळू शकता येते. गॅस लिक झाल्यानंतर सिलिंडरमध्ये आग लागली तर एखादी चादर किंवा टॉवेल लगेच पाण्यामध्ये भिजवा आणि त्यानंतर लगेच सिलिंडरवर टाका. त्यामुळे आग लगेच विझण्यास मदत होईल आणि कोणतीही मोठी जीवितहानी होणार नाही.
कोणत्या परिस्थितीत किती मिळतो विमा ?एलपीजी इन्शुरन्स कव्हरमध्ये ५० लाख रुपयां- पर्यंतचा विमा काढला जातो. गॅस सिलिंड रमुळे झालेल्या कोणत्याही दुर्घटनेत जीवित, तसेच वित्तहानीही होते. गॅस कनेक्शनसह ग्राहकांना ४० लाख रुपयांचा अपघाती विमा मिळतो. यात सिलिंडर ब्लास्ट झाल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास ग्राहक ५० लाख रुपयां- पर्यंत क्लेम करू शकतो. तसेच सिलिंडर ब्लास्टमध्ये प्रॉपर्टी, घराचे नुकसान झाल्यास प्रति अॅक्सिडेंट दोन लाख रुपयांपर्यंतचा इन्शुरन्स क्लेम मिळतो.