मनोज ताजने गोंदियाजादूटोण्याच्या संशयातून झालेल्या हत्येमुळे चर्चेत आलेले मंगेझरी हे गाव अवघे १२०० लोकवस्तीचे आहे. गावाच्या एका कोपऱ्यात झालेली घडामोड वाऱ्यासारखी काही क्षणात दुसऱ्या कोपऱ्यात पसरते. पण अनिल हळदे यांची बेदम मारहाण करून हत्या करताना त्याचा आवाज कोणालाच ऐकायला आला नाही, असे होऊ शकत नाही. गावातील अनेक लोक या घटनेचे साक्षीदार आहेत. पण पोलिसांच्या ससेमिऱ्यामुळे आणि मारेकऱ्यांच्या भितीमुळे कोणीही ही घटना मी पाहिली असे म्हणण्यास तयार नाही. सर्वकाही नजरेसमोर घडले असताना आपण काहीच पाहीले नाही, आपल्याला काहीच माहीती नाही, असे उत्तर पोलिसांना मिळत आहे.या प्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून सखोल माहिती घेण्यासाठी दिनांक १६ पर्यंत पीसीआर मिळविला. आरोपींनी गुन्ह्याची कबूली ही केली, पण जोपर्यंत या घटनेची साक्ष कुणी देणार नाही तोपर्यंत न्यायालयात हे प्रकरण तग धरू शकणार नाही. आरोपी आज जरी गुन्हा कबूल करीत असले तरी न्यायालयात ते आपले बयाण पलटवू शकतात. त्यासाठी प्रत्यक्ष घटना पाहणारे साक्षीदार पोलिसांसाठी महत्वाचे ठरणार आहे. आदिवासी समाजाचे प्राबल्य मंगेझरी या जंगलाने वेढलेल्या गावात आदिवासी समाजाचे प्राबल्य आहे. केवळ पाच घरे पोवार समाजाची तर चार घरे मरार समाजाची आहेत. त्या मरार समाजाच्या चार भावंडामध्ये वर्षभरापूर्वी अनिल हळदेची भर पडली होती. त्यामुळे बाहेरगावाहून आलेली दुसऱ्या समाजातील व्यक्तीच गावात जादूटोणा करू शकते, असा समज काही लोकांनी करून अनिल विरूध्द गावात वातावरण तयार केले आणि त्याला कायमचे दूर केले. तिघांच्या मृत्यूने बळावला जादूटोण्याचा संशय वर्षभरापासून मंगेझरीत राहायला आलेला अनिल जादूृटोणा करतो असा संशय गेल्या काही दिवसांतच बळावला होता. गेल्या दीड ते दोन महिन्यांत गावातील दोन शाळकरी मुलांसह एका इसमाचा आजाराने मृत्यू झाला. या शिवाय गावातील एक महिलाही आजारी आहे. त्या सर्वांवर अनिलने जादू केली होती असा गावकऱ्यांच्या संशय आहे. होळीची राख तळहातावर घेऊन अनिल दुसऱ्यांकडे पाहून ‘छू’ करीत होता, अशी माहिती आहे. गावकऱ्यांच्या अंधश्रध्दाळूपणामुळे त्यांनी या जादूचा धसका घेतला होता. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी त्यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलेला नाही. या प्रकरणात आरोपी या पेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे. पोलिसांत कोणी साक्ष देऊ नये यासाठी आरोपींच्या लोकांकडून गावात दहशत पसरविण्यात आली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करावी.डॉ. प्रकाश धोटे जिल्हा संघठक, अंनिस
मंगेझरीत हाताची घडी, तोंडावर बोट
By admin | Updated: March 14, 2015 01:32 IST