विजय मानकर सालेकसानैसर्गिक सौंदर्याने नटलेला व घनदाट जंगलाने व्यापलेला सालेकसा तालुक्याचा हाजराफॉल धबधबा शेकडो वर्षापासून पर्यटकांना आकर्षित करीत आहे. परंतु शासनाच्या सततच्या दुर्लक्षामुळे व येथे येणाऱ्या बेलगाव पर्यटकांच्या आत्मघाती घटनांमुळे, मागील काही वर्षांपासून तारूण्याच्या जोशात नको ते कृत्य करीत असल्यामुळे तसेच येथील तलावात पडून युवक युवतींचा मृत्यू होत असल्यामुळे हाजराफॉल जास्त कुप्रसिध्द होत चालला आहे.मागील अपघातांपासून धडा न घेता पुन्हा तेच आत्मघाती कृत्य याठिकाणी नेहमी होत राहिले. याच बरोबर येथे येवून सर्वत्र घाण पसरवणे, ओल्या पार्ट्या आयोजित करणे, अश्लील कृत्य करणे व नैसर्गिक वातावरणाला दूषित करणाऱ्यांची संख्यासुध्दा दिवसेंदिवस वाढत चालली होती. याबाबत वेळोवेळी लोकमतने अनेक बातम्यासुध्दा प्रकाशित केल्या आहेत. याचा प्रभाव लोकप्रतिनिधींवर तर पडला नाही, परंतु या परिसरालगत असलेल्या नवाटोला येथील युवावर्गावर पडला. तसेच वन विभागाच्या काही अधिकाऱ्यांनासुध्दा यावर गांभीर्याने विचार करावा लागला. मागील महिन्यात गोंदिया वन विभागाचे उपवनसरंक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी नवाटोला गावाला भेट दिली आणि नवाटोला येथील वन व्यवस्थापन समितीची बैठक घेतली. समितीचे अध्यक्ष रामदीन उईके यांच्या आवाहनावरून समितीचे सर्व सदस्य उपस्थित झाले. या बैठकीत डॉ. रामगावकर यांनी हाजराफॉल परिसराला सुरक्षित ठेवण्याचे व त्यासाठी श्रमदान करण्याचे प्रस्ताव समितीसमोर मांडले. रामगावकर यांनी आपल्यासोबत पर्यटन क्षेत्राचे अभ्यासू असलेले तीन विशेषज्ञ आणले होते.याप्रसंगी त्यांनी हाजराफॉलच्या सौंदर्यीकरणाची कल्पना मांडली. ही कल्पना मांडताना या परिसरात स्वच्छता मोहीम राबविणे, बेरोजगारांना प्रशिक्षण देणे, गमती-जमतीचे विविध उपक्रम घेणे, श्रमदानातून स्वच्छता मोहीम यशस्वी करणे अशा अनेक कल्पना मांडल्या. या सर्व कल्पना वन व्यवस्थापन समितीच्या युवकांना आवडल्या. गावात बेरोजगार फिरत असण्यापेक्षा आपण आपला वेळ काही चांगल्या कामात घालावे, अशी मंशा त्याच्यात जागृती झाली. आणि १७ आॅक्टोबरपासून नवाटोला येथील बीट वनरक्षक एस.एच. रहांगडाले यांच्या मार्गदर्शनात समितीचे सगळे २० युवक हाजराफॉल परिसरात दाखल झाले. सर्वप्रथम त्यांनी परिसरात स्वच्छता मोहीम सुरू केली. या अंतर्गत हाजराफॉल परिसरात पडलेली घाण, प्लास्टीक पिशव्या, उष्टे प्लेट, प्लास्टीकचे ताट, कागद, कोंबड्या व बकऱ्यांची हाडे, तुटलेले चपला-जोडे, चिंध्या, खाद्य पदार्थांचे प्लास्टीक डबे, खरड्याचे पट्ट्या इत्यादी शेकडो प्रकारचे घाण पसरवणाऱ्या टाकाऊ वस्तू गोळा करून त्यांना एका ठिकाणी टाकून ठेवण्याचे काम करीत आहेत. पंधरा दिवसांपूर्वी सुरू झालेले हे काम आता दररोज दोन ते तीन वेळा युवक करीत आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या पर्यटकांना घाण पसरविण्यापासून थांबविण्याचे पूरजोर प्रयत्न करीत आहेत. या व्यतिरिक्त बेलगाम पर्यटकांवर लगाम घालणे, यात हाजराफॉल पहाडावरून धबधबा पडण्याच्या ठिकाणी जाण्यास मनाई करणे, परिसरात धूम्रपान-मद्यपान करणे, स्वयंपाक करणे, खोल पाण्यात जावून आंघोळ करणे व पोहणे, दगडावर बसून पाण्यात दगड मारणे इत्यादी नुकसानदायक व धोकादायक कृत्य करण्यास थांबविण्याचे काम करीत आहेत. काही युवक प्रवेशाच्या ठिकाणी नाकाबंदी करून प्रत्येक पर्यटकाला थांबवून त्याची चौकशी करून त्यांच्या वाहनाचा नंबर, पर्यटकांची संख्या, पत्ता इत्यादींची आपल्या रजिस्टरवर नोंद करून नंतर आत प्रवेश देण्यात येत आहे. यामुळे बऱ्याच प्रमाणात पर्यटक अनुशासनाचा पालन करू लागले आहेत. समितीचे सगळे युवक प्रत्येक काम संगटीतपणे करीत असल्याने काही अरेरावी करणारे पर्यटकसुध्दा जास्तीचा शहाणपण दाखविण्यात मागेपुढे पहात असतात. दरम्यान या युवकांना वनरक्षक रहांगडाले यांचे नेहमी सहकार्य लाभत आहे. तसेच सालेकसा क्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.जे. देंडे यांचेही मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे. हाजराफॉल परिसराचा वनविभाग आणि एफडीसीएफ यांच्याही ताब्यात काही भाग असल्यामुळे युवकांना काही लोकांनी अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले. परंतु युवकांचे श्रमदान व सत्कार्य बघून आता त्यांना सहकार्य करण्याची तयारी दाखविली जात आहे. हाजराफॉल परिसर हा नवाटोला बीटच्या क्षेत्रात समाविष्ट असून एकूण ४८१.४९८ हे.आर.मध्ये असलेल्या बीटच्या क्षेत्रापैकी हाजराफॉल परिसर १११.०८७ हेआरमध्ये व्याप्त असून कंपार्टमेंट क्रमांक १८५७ मध्ये मोडतो. या परिसरात व परिसरालगत चारही बाजूला सर्वत्र घनदाट जंगल, विविध औषधोपयोगी वनस्पती, विविध उपयोगी इमारती व फर्निचर निर्माण करण्याच्या कामात येणारे किमती वृक्ष यात सागवानसारख्या महागड्या वृक्षांचे भरपूर प्रमाण आहे. या क्षेत्रात अवैध लाकूड कटाईसुध्दा मोठ्या प्रमाणावर चालत असते. त्याप्रमाणे घनदाट जंगल व नदीनाले असल्याने विविध प्रकारचे पशू-पक्षीसुध्दा जंगलात वावरतात. अलीकडे प्राण्यांचे शिकारसुध्दा मोठ्या प्रमाणावर होत राहिले. त्यामुळे वृक्षकटाई व वन्य प्राण्यांच्या शिकारी थांबविण्यासाठी हे युवक सतत प्रयत्नशील असतात. या परिसरात विशेषकरून हरीण, सांभर, रानडुकरांचा शिकार करून त्यांचे मांस भक्षण करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर होत होते. त्यामुळे तृणभक्षी प्राण्यांवर आश्रित असलेले वाघासारखे मांसभक्षी प्राणीसुध्दा लुप्त होत चालले होते. परंतु या युवकांच्या अभूतपूर्व कामगिरीमुळे या परिसरातील गतवैभव परत येण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. जिद्द व चिकाटीने श्रमदान करीत असलेले युवक पर्यटकांना बसण्यासाठी निकामी पडलेले विजेचे खांब दगडावर मांडून ठेवतात. तर प्राण्यांना पाणी पिण्यासाठी सोईस्कर घाटसुध्दा निर्माण करून देत आहेत. या युवकांनी खाली राहण्यापेक्षा असे कार्य करणे सुरू केल्याने एक आगळा-वेगळा आदर्श निर्माण झाला आहे.श्रमदान करणाऱ्या या उत्साही युवकांमध्ये महेश वरखडे, रेवल उईके, रामासम मडावी, प्रदीप बी.मडावी, रमेश उईके, प्रदीप टी. मडावी, संतोष कोडवती, विजय मडावी, राधेश्याम मडावी, अक्षय गायधने, निहाल मडावी, संजय टेकाम, नरावेद मडावी, चुन्नीलाल मडावी, जोहन परते, निलचंद मडावी, प्रदीप वरखडे, लक्ष्मण मडावी, विजय कोडवती, रोशन उईके या युवकांचा समावेश आहे.
हाजराफॉलचा होणार कायापालट
By admin | Updated: November 8, 2014 01:27 IST