कृषी चिकित्सालयात कार्यक्रम : प्रगतिशील शेतकऱ्यांची उपस्थिती गोंदिया : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती महाराष्ट्र शासन कृषी व पणन विभागाच्या वतीने २९ आॅगस्ट रोजी शेतकरी दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रगतिशील शेतकऱ्यांशी नवनवीन प्रयोगांबाबत चर्चा करुन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.जवळील ग्राम कारंजा येथील कृषी चिकित्सालयात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी सोलंकी व लिल्हारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.डॉ. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्यगौरवा बाबत उपविभागीय कृषी अधिकारी नाईनवाड यांनी प्रास्ताविकात माहिती दिली. तर कुरील यांनी, प्रगतीशील शेतकऱ्यांच्या शेतातील नवनवीन प्रयोगाबाबत चर्चा करुन डॉ. विखे पाटील यांच्या जयंती दिनी त्यांनी शेतीतील विविध प्रयोग व शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनावरील प्रक्रिया उद्योग या बाबत घेतलेल्या पुढाकाराबद्दल मार्गदर्शन केले. दरम्यान प्रक्षेत्रावर मान्यवर शेतकरी सोलंकी व लिल्हारे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. शासकीय प्रक्षेत्रावर विविध नाविन्यपुर्ण उपक्रम जसे सौर व पवन उर्जेवर चालणारे संयंत्र, शिंगाडा लागवड, संरक्षीत सिंचनासाठी शेततळे व यंत्राद्वारे भात पिकाची धुळ पेरणी केलेल्या प्रात्यक्षिक प्लॉटची पाहणी शिवार फेरीद्वारे करण्यात आली. तसेच प्रक्षेत्रावरील प्रगतीवर असलेले पंप हाऊस, पॅकहाउस व अतीसंवर्धीत फळपिक लागवड डाळींब, सिताफळ, पेरु, आंबा यांची पाहणी करण्यात आली. तसेच चर्चासत्रा दरम्यान शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांपासून पिकांच्या नुकसानी बाबत मुद्दा उपस्थित केलेला होता. त्याकरीता कमी किंमतीत शेतकऱ्यांना परवडणारे व कमी धोकादायक यंत्रांची माहिती कुरील यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन तंत्र अधिकारी गिरमारे यांनी केले. आभार तालुका कृषि अधिकारी वहाने यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
नवनवीन प्रयोगांवर मार्गदर्शन
By admin | Updated: August 30, 2014 23:52 IST