गोंदिया : चितारओळी हे नाव कानी पडताच नागपुरातील मूर्तीकारांची वस्ती असलेली बोळ डोक्यात येते. मुर्तीकारांचे निवास असल्याने नागपूरकरांचे कान्होबा, गणेशोत्सव, शारदा व दुर्गास्थापना हे सण येथूनच सुरू होतात. याच चितारओळीचे स्वरूप सध्या येथील सिव्हील लाईंस परिसरातील हनुमान चौक ते इंगळे चौक या मार्गाला आहे. लगतच्या परिसरातील मूर्तीकार मागील कित्येक वर्षांपासून येथेच आपले बस्तान मांडत असल्याने मुर्त्यांचे बुकींग करण्यासाठी गोंदियातली ही चितारओळी गजबजू लागली आहे. जिवती झाली की हिंदू धर्मीयांच्या सणांना सुरूवात होते. एका पाठोपाठ एक सण येतात व हिंदू धर्मीयांसाठी हा काळ चैतन्याचा असतो. यात कान्होबापासून मुर्तीपूजनाचे सण सुरू होता. त्यानंतर गणपती, शारदा, दुर्गा, भुलाबाई व लक्ष्मीपूजन या क्रमाने मुर्तीपूजनाचे मुहूर्त असतात. शहरात मोठ्या संख्येत खाजगी व सार्वजनिक स्तरावर हे उत्सव साजरे केले जात असल्याने येथील उत्सवांची लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यापर्यंत ख्याती आहे. तर या सणांची भव्यता बघण्यासाठी या राज्यांतील भाविक शहरात येतात. नेमकी हीच बाब हेरून परिसरातील मुर्तीकार सध्या आपल्या परिवारासह सध्या सिव्हील लाईंस परिसरातील हनुमान मंदिर ते इंगळे चौक व परिसरात ठाण मांडत आहेत. मागील कित्येक वर्षांपासून हे मुर्तीकार येत असल्याने त्यातही आपल्या इमारत व जागेत त्यांच्या हातून देव घडत असल्याने या रांगेतील रहिवासी स्वेच्छेने आपली जागा त्यांना देतात. यामुळे मुर्तीकार सुद्धा हक्काने आता येथे येत असून आपला व्यवसाय करतात. येत्या १७ आॅगस्ट रोजी जन्माष्टमी तर २९ आॅगस्ट रोजी गणपती स्थापनेचा मुहूर्त आहे. त्यामुळे आता मोजकेच दिवस असल्याने मुर्तीकार दिवस- रात्र एक करून मातीला आकार देण्यात रमले आहेत. विशेष म्हणजे येता-जाता तयार होत असलेल्या मुर्त्या बघून सिव्हील लाईंसवासीयांसह अन्य भागातील नागरिक सुद्धा आकर्षीत होत आहेत. शिवाय ऐनवेळी धावपळ होत असल्याने आतापासूनच मुर्त्यांचे बुकींग सुरू झाले आहे. आपली मुर्ती सर्वांपेक्षा वेगळी व बजेट मध्ये असावी यासाठी नागरिक मुर्तीकारांकडे बसून बुकींग करून घेत आहेत. यामुळे दिवसभराच्या त्यांच्या ये-जा मुळे गोंदियातली ही चितारओळी सध्या चांगलीच गजबजू लागली आहे. (शहर प्रतिनिधी)
गजबजू लागली गोंदियातली ‘चितारओळ’
By admin | Updated: July 31, 2014 00:06 IST