सुकडी/डाकराम : तिरोडा तालुक्यातील सुकडी/डाकराम, पिंडकेपार, बुचाटोला, बोदलकसा, ठाणेगाव, मेंढा, खडकी, डोंगरवार, इंदोरा, निमगाव, मंगेझरी यासह अनेक गावांमध्ये शेतकरी धानपिकासह विविध भाजीपाल्यांचे पीक घेतात. पण सध्या वातावरणात बदल होत असल्यामुळे सर्वत्र पिंकावर किडींचा प्रादुर्भाव झाला असून या क्षेत्रातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. परिसरात धान कापनीची कामे जोरात सुरु असूनसुद्धा धान पिकावर किडींचे आक्रमण सुरूच सुरूच आहे. वातावरणात बदलामुळे धानपिकांवर अळीचे आक्रमण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे आता शेतकरी विविध कीटकनाशक औषध फवारणीसाठी महागड्या औषधीचा वापर करीत आहेत, अशी परिस्थिती भारी धानाच्या पिकांवर दिसून येत आहे. तिरोडा तालुक्याच्या काही भागात शेतकरी धानाच्या पिकांबरोबरच भेंडी, बरबटी, वांगी, टमाटर, कोबी, कारले, मुळा व विविध पाल्याभाज्यांची लागवड करतात. पण सध्या वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे या सर्व भाजी पिकांवर विविध प्रकारच्या अळ्या तयार होऊन भाजीपाल्यांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागणार, असे चित्र दिसून येत आहे. मागील महिन्यापूर्वीच शेतकऱ्यांना पावसाच्या कमी प्रमाणामुळे हलक्या धानाचे पीक काढताना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागला. आणि आता अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. आता वातावरण बदलामुळे भारी धानावर विविध रोगांचे आक्रमण झाल्याने ‘आमदनी अठनी, खर्चा रुपया’ अशी परिस्थिती निर्माण होताना दिसून येत आहे. शासनाच्या वतीने या क्षेत्रातील शेतकऱ्यांना विविध रोगांपासून आपल्या पिकांना कसे वाचविता येईल व त्यासाठी कोणते उपाय करावे, यासाठी गावागावात कृषी विभागाने शिबिरे घेऊन जनजागृती करणे गरजेचे झाले आहे. शेतकऱ्यांना निराशेकडून आशेकडे वळविण्यासाठी कमी दराने विविध कीटकनाशक औषधींचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. पिकांवरील किडींच्या आक्रमणाकडे संबंधित कृषी विभागानेसुद्धा दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. आता मोठ्या प्रमाणात धानाची कापणी सुरु असून धानावर रोगांचे आक्रमण करणे सुरुच आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. खातिया : तालुक्यातील खातिया, मोगर्रा, अर्जुनी, बिरसी, कामठा या ग्रामीण गावांमध्ये आपल्या धानाच्या पिकांना घेऊन सध्या शेतकरी फार त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. पूर्वीपासूनच शेतकऱ्यांना आर्थिक संकट सहन करावे लागत आहेत. सध्या धान पिकावर मावा हा रोग पसरला आहे. त्यामुळे शेतकरी आता चिंताग्रस्त झालेला दिसून येत आहे. यावर्षी पाऊस उशिरा सुरु झाल्याने शेतकऱ्यांना उशिरा रोवणी करावी लागली. त्यामुळे बऱ्याच शेतकरी धान कापनीसुद्धा उशिरा करीत आहेत. यातच मावा रोगाने धानावर आक्रमण केल्याणे औषध फवारणीचे अधिकम आर्थिक संकटाला झुंज द्यावी लागत आहे. यापूर्वीच खोडकिडा या रोगाचा धान पिकांवर प्रादुर्भाव झाले होते. या ग्रामीण भागातील कामठा, खातिया, बिरसी, अर्जुनी, मोगर्रा, बटाना, परसवाडा, झीलमीली या गावांमध्ये मावा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हातचे धान पीक निसटून जाण्याची भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे. सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना मावा रोगावर प्रतिबंध करण्यासाठी किटकनाशक औषध कमी दरात देण्यात यावी व कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
पिकांवर किडींचा प्रादुर्भाव
By admin | Updated: November 8, 2014 01:28 IST