वेतनाची मागणी : अन्यथा कारवाई करण्याची मागणी
भंडारा : आयटक संलग्न ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या भंडारा जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्च्याचे नेतृत्व जिल्हा अध्यक्ष माधव बांते, कार्याध्यक्ष शिवकुमार गणवीर व जिल्हा सचिव हिवराज उके यांनी केले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनावर १०० टक्के अनुदान देण्यात यावे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी देण्यात यावी, पेंशनचा कायदा लागू करावा म्हणून संघटना सातत्याने लढा देत आहे. त्यानुसार, शासनाने ग्रामपंचायतीची परिमंडळनिहाय वर्गवारी करुन ५० टक्के, ७५ टक्के, १०० टक्के अनुदान देण्याचा भंडारा जिल्हा परिषदेला ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ५ कोटी १९ लाख ९१ हजार ७१३ रुपये पाठविला. ती रक्कम ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी असल्याने त्यांनाच देण्यात यावी. पण पूर्ण पणे वेतनरुपाने कर्मचाऱ्यांना देण्यात आली नाही. कदाचित नेहमीप्रमाणे ही रक्कम संबंधित ग्रामपंचायत सचिवाने अन्य बाबींवर खर्च केली असावी, असे असेल तर हे शासन आदेशाचे उल्लंघन होईल. अशा ग्रामपंचायत वर कायदेशीर कार्यवाही करावी व कर्मचाऱ्यांचे वेतन तत्काळ देण्यात यावी ही प्रमुख मागणी होती. तसेच आकृतिबंधातील किंवा बाहेरील कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतची आहे. तो देण्यात यावा. सुट्या न देण्याऱ्या ग्रामपंचायतविरुध्द कार्यवाही करावी व कर्मचाऱ्यांकडून त्या पदाचेच काम घ्यावे आदी मागण्या होत्या. यावर त्वरित योग्य कारवाई करुन केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी मे महिन्यात संघटनेबरोबर आढावा बैठक घेऊ, मात्र तोपर्यंत संघटनेच्या सर्व मागण्या पूर्ण करु, असे आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आडे यांनी दिले. शिष्टमंडळात शिवकुमार गणवीर, हिवराज उके, माधव बांते, रामलाल बिसने, गजानन लाडे, माणिक लांबट, मारोती चेटूले, विनोद पटले, होमराज वाघाडे, रुपेश बोरकर, वामन चांदेवार आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)