गोंदिया : कॉंग्रेसच्या शासनकाळात धानाला तीन हजार रूपये प्रती क्विंटल हमी भावाची मागणी करून याच भाजपच्या नेत्यांनी गोंदिया-भंडारा व गडचिरोली जिल्ह्यात रस्ता रोको आंदोलन केले होते. एवढेच नव्हे तर सत्तेत आल्यास भाजप सरकार शेतकऱ्यांचा सात/बारा कोरा करणार, असे सांगत फिरत शेतकऱ्यांना चांगल्या दिवसांचे स्वप्न दाखवित होते. आता मात्र सत्तेवर आल्यावर हेच भाजप सरकार धानाला एक हजार ३६० रूपये हमी भाव देऊन आत्महत्या करण्यासाठी मजबूर करीत आहे. आता या भाजप सरकारने सात/बारा कोरा करून चांगले दिवस नाही तर किमान सरसकट १० हजार रूपये हेक्टरी मदत देऊन चांगले क्षण तरी आणावे, अशी मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विधानसभेत केली. गोंदिया-भंडारा- गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची पुरजोरपणे बाजू मांडत वेळप्रसंगी तिव्र आंदोलनाचाइशारा ही सरकारला दिला. आमदार अग्रवाल यांनी, दुष्काळग्रस्त राज्यात केंद्र सरकारच्या आदेशावरून राज्य सरकारला बोनस देण्यावर बंदी लावली आहे. एकीकडे कॉंग्रेस शासनकाळात मागील वर्षी २०१३ मध्ये धानाला एक हजार ५१० रूपये प्रती क्वींटल हमी भाव दिला जात होता. यावर विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस व अथर्मंत्री मुनगंटीवार यांनी रस्ता रोको करून तीन हजार रूपये भावाची मागणी केली होती. आता मात्र केंद्र व राज्यात भाजप सरकार व राज्यात हे दोघे मुख्य असताना एक हजार ३६० हमी भाव दिला जात आहे. कॉंग्रेसने आपल्या शासनकाळात शेतकऱ्यांचे ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. आता पाळी भाजप सरकारची असून त्यांनी दिलेल्या आश्वासना नुसार वागण्याची वेळ आली असू धानाला सरसकट १० हजार रूपये हेक्टरी मदत देण्याची देण्याची मागणी आमदार अग्रवाल यांनी केली. तर गजर पडल्यास धान उत्पादन शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी विधानसभेत दिला. यावर अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी या मुद्यांवर गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले. (शहर प्रतिनिधी)
सरकारने चांगले दिवस नाही, तर चांगले क्षण तरी आणावे
By admin | Updated: December 22, 2014 22:50 IST