सभा : माणिकराव ठाकरे यांचे प्रतिपादनलाखनी : भाजपाच्या सरकारने शेतकरी व गरीबांच्या समस्या वाढविल्या आहेत. श्रीमंतांचे हित सांभाळणारे सरकार भाजपाचे आहे. केवळ विकासाकडे लक्ष देणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करणे आवश्यक आहे. लाखनीच्या विकासात काँग्रेसने महत्वाची भूमिका बजावली. तालुका निर्मितीपासून ते विविध शासकीय कार्यालयांना प्रारंभ काँग्रेसच्या कारकिर्दीत झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भापुरत्या मर्यादित होत्या. त्या आता पश्चिम महाराष्ट्रात पोहचल्या आहेत. काँग्रेस जे भाव धानाला तीन वर्षापूर्वी दिले ते आजही कायम आहे. शेतकरी व गरीबांच्या हिताच्या विरुद्ध कार्य केंद्र व राज्य शासन करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे.स्थानिक स्वप्नदीप सभागृहात तालुका काँग्रेस कमेटीद्वारे लाखनी नगरपंचायत निवडणूक काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले. मंचावर प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री डॉ.नितीन राऊत, आ.गोपालदास अग्रवाल, माजी आमदार सेवक वाघाये, जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिल्लोरकर, जिल्हा परिषद सभापती विनायक बुरडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जिया पटेल, पंचायत समिती सभापती रजनी आत्राम, जि.प. सदस्य ज्ञानेश्वर रहांगडाले, पंचायत समितीचे उपसभापती विजय कापसे, बाजार समिती संचालक रामकृष्ण वाढई, पंचायत समिती सदस्य मोरेश्वरी पटले, सरपंच राजेश खराबे, मनोहर सिंगनजुडे, नारायण तितीरमारे, कृउबा संचालक अनमोल काळे, तालुका अध्यक्ष सुनिल गिऱ्हेपुंजे, मनोहर टहिल्यानी, इकबाल आकबानी, धनंजय तिरपुडे, दत्ता गिऱ्हेपुंजे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक माजी आमदार सेवक वाघाये यांनी केले. डॉ.नितीन राऊत यांनी आरक्षण संपविण्याची भाषा करणारे सरकारचे प्रतिनिधींनी फक्त श्रीमंतांचाच विचार केला असल्याचे स्पष्ट केले. आरक्षण संपवायचे असेल तर अगोदर जातीप्रथेचा समूळ नायनाट करावा त्यानंतरच आरक्षणाचा मुद्दा मांडावा असे विचार व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)
सरकार शेतकरीविरोधी
By admin | Updated: October 31, 2015 02:36 IST