भाजपने बाजी मारली : जयस्वाल नगराध्यक्ष तर रंगारी उपाध्यक्षगोंदिया : गोंदिया नगर पालिकेत अखेर १२ वर्षानंतर पुन्हा एकदा भाजपचा नगराध्यक्ष पदारूढ झाला आहे. बुधवारी झालेल्या निवडणुकीत भाजपचे कशिश जयस्वाल यांनी काँग्रेसचे राकेश ठाकूर यांचा ६ मतांनी पराभव करून नगराध्यक्षपद काबीज केले. उपाध्यक्षपदी शिवसेनेचे हर्षपाल रंगारी यांनी बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर वालदे यांचा ५ मतांनी पराभव केला.या निवडणुकीत नगराध्यक्षपदाकरिता जयस्वाल यांना १७ तर प्रतिस्पर्धी ठाकूर यांना ११ मते पडली. तर उपाध्यक्षपदासाठी रंगारी यांना १७ आणि वालदे यांना १२ मते मिळाली. विशेष म्हणजे या महत्वपूर्ण निवडणुकीत दोन अपक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि भाजपाचे दोन सदस्य गैरहजर होते.दुपारी १२ वाजता नगर पालिकेच्या सभागृहात आयोजित विशेष सभेत हात उंचावून व्हिडीओ चित्रीकरणात ही निवड प्रक्रिया झाली. पिठासीन अधिकारी गोंदियाचे उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव यांनी मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्या सहकार्याने ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली.अडीच वर्षापूर्वी झालेल्या नगर पालिकेच्या निवडणुकीत एकूण ४० सदस्यांपैकी सर्वाधिक १६ सदस्य भाजपाचे निवडून आले होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी प्रचाराचे तंत्र स्वत:कडे ठेवून पहिल्यांदाच भाजपला हे यश मिळवून दिले होते. शिवसेनेच्या तीन नगरसेवकांना सोबत घेऊन गोंदिया नगर पालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपचे प्रयत्न सुरू असतानाच दोन अपक्षांंना आपल्याकडे ओढून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमताचा आकडा जमविला. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. मात्र आता ऐन विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना भाजपने नगर पालिकेची सत्ता काबीज करून काँग्रेसला धक्का दिला आहे.सत्तांतरबंदी कायद्यानुसार तीन महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या तीन नगरसेवकांना अपात्र घोषित करण्यात आल्यामुळे सत्ताधारी पदाधिकारी अल्पमतात आले होते. त्यामुळे नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यासाठी घोडेबाजार तेजीत होता. भाजप व शिवसेनेने आपल्या नगरसेवकांना आधीच राजस्थानच्या सहलीवर पाठविले होते. मंगळवारी हे सदस्य नागपुरात आले आणि त्यानंतर गोंदियात पोहोचले. मात्र दोन सदस्य या सहलीवर गेलेच नव्हते. ते निवडणूक प्रक्रियेतही शेवटपर्यंत अनुपस्थित राहिले. (जिल्हा प्रतिनिधी)ओढाताणीचे राजकारणसत्तेसाठी बहुमताचा आकडा जमविण्यासाठी सत्तापक्षांकडून अपक्षांसह भाजपच्या दोन नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न झाला. भाजपचे अनिल पांडे आणि महेंद्र उईके हे दोन सदस्य काही दिवसांपासून दिसेनासे झाले होते. बुधवारच्या निवडणूक प्रक्रियेतही ते सहभागी झाले नव्हते. दुसरीकडे आतापर्यंत सत्ताधारी पक्षासोबत असलेले अपक्ष नगरसेवक विजय रगडे आणि विष्णू नागरीकर हेसुद्धा अनुपस्थित होते. त्यामुळे ते भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा होती. एवढेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्या बानेवार, कोमल आहुजा, शारदा हलानी, चंद्रकला देशमुख हे चार नगरसेवकही उपस्थित नव्हते. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राकाँचे गप्पू गुप्ता यांनी कोणालाही मतदान केले नाही.
गोंदियात सत्तापालट
By admin | Updated: August 6, 2014 23:54 IST