गोंदिया : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष सोनिया गांधी शनिवारी ११ आॅक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या गोंदियातील सर्कस मैदानात सायंकाळी ४.३० वाजता जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यांच्या आगमनापूर्वी व संपूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत नियोजन व सुरक्षेच्या दृष्टीने सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.गोरेगावकडून गोंदियाकडे येणारी जड वाहतूक आयटीआयपासून रस्त्याच्या डाव्या बाजूला पार्किंग करून ठेवली जाईल. आमगावकडून गोंदियाकडे येणारी जड वाहतूक पतंगा मैदानापासून (जि.प. कार्यालयाजवळ) डाव्या बाजूला पार्किंग केली जाईल. बालाघाटकडून गोंदियाकडे येणारी जड वाहतूक रावणवाडी चौकापासून डाव्या बाजूला पार्किंग करून ठेवण्यात येईल. तसेच तिरोड्याकडून गोंदियाकडे येणारी जड वाहने कुडवा नाक्यापासून डाव्या बाजूला पार्किंग करून ठेवण्यात येणार आहे. जयस्तंभ चौकाकडून गांधी पुतळा, मार्केटकडे जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. जयस्तंभ चौकाकडून बालाघाट-तिरोड्याकडे जाणारी-येणारी, तसेच गणेशनगरकडून सर्कस मैदानाकडे येणारी, गर्ल्स कॉलेजकडून आंबेडकर चौकाकडे येणारी, न्यायालयाकडून आंबेडकर चौकाकडे येणारी, शिवसेना कार्यालयाकडून गांधी चौकाकडे येणारी, छोटा पाल चौकाकडून विशाल मेगामार्टकडे येणारी, तिरोडा रिंगरोड व बालाघाट रोडकडून मरारटोली बस स्थानकाकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. गोरेगाव रस्त्यावरून सभेला येणाऱ्या नागरिकांसाठी आयटीआय येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांनी फुलचूर नाका, निर्मल टॉकीज, गणेशनगरमार्गे, डॉ. चिटणीस यांच्या दवाखान्यासमोरून सर्कस मैदानात पायी जावे लागेल. आमगाव रस्त्यावरून सभेला येणाऱ्या नागरिकांसाठी पतंगा मैदानात पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे. त्यांनी फुलचूर नाका, निर्मल टॉकीज, गणेशनगर मार्गे, डॉ. चिटणीस दवाखान्यासमोरून सर्कस मैदानात पायी जावे लागेल. बालाघाट रस्त्याकडून सभेला येणाऱ्या नागरिकांकरिता नगर परिषद शाळा मरारटोलीच्या प्रांगणात पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे. त्यांनी मरारटोली बस स्थानक, शक्ती चौक, नेहरू चौक, गोरेलाल चौक, गांधी प्रतिमा, नगर परिषद समोरून पाणी टाकीमार्गे सर्कस मैदानात पायी जावे लागेल. तिरोड्याकडून सभेला येणाऱ्या नागरिकांकरिता टी.बी. हॉस्पिटल गोंदियाच्या प्रांगणात पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांनी पाल चौक, अंडर ग्राऊंड, राजस्थानी कन्या विद्यालय गोंदिया, चांदनी चौक, नगर परिषद उजवी बाजू, पाणी टाकी मार्गे सर्कस मैदानाकडे पायी जावे लागेल. सदर कार्यक्रम संपताच रहदारी पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
सोनिया गांधींच्या आगमनानिमित्त गोंदियात तगडा बंदोबस्त
By admin | Updated: October 11, 2014 01:48 IST