गोंदिया : गोंदिया ते तिरोडा रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्याच्या दोन्ही कडेला अनेक वर्षांपासून मुरुम घालण्यात आलेला नाही. तेथील जागा सपाट नसून उंच-सखल झाली आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमी अपघाताची शक्यता असते. तसेच अनेकदा मोठे अपघातही झाले आहेत. मुंडीपार, डोंगरगाव, किडंगीपार, गंगाझरी, सुखदेवटोली, दांडेगाव, एकोडी, काचेवानी आदी गावे या मार्गावर येतात. या मार्गाने मोठ्या प्रमाणात अनेक अवजड वाहने धावतात. या रस्त्याच्या कडेला अनेक वर्षांपासून मुरून घालण्यात न आल्याने नेहमी अपघाताची शक्यता असते. पावसाळ्याच्या पूर्वी या खड्ड्यांत व रस्त्याच्या कडेला मुरूम घालून रस्ता सपाट करणे गरजेचे होते. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांच्या हलगर्जीपणामुळे सदर कार्य प्रलंबित आहे. गोंदिया-तिरोडा मार्गावरील नाल्यांवर लोखंडी रेलिंग लावण्यात आली नाही. तसेच मोठ्या वळणांवर रिफ्लेक्टरसुद्धा लावण्यात आले नाही. रात्रीबेरात्री अदानी पॉवर प्लाटचे ट्रक ये-जा करतात. त्यामुळे हा रस्ताच धोकादायक ठरला आहे. या मार्गावरील प्रत्येक गावात गतीरोधकाची निर्मिती करावी अशी मागणी परिसरातील गावकऱ्यांनी केली आहे.
गोंदिया-तिरोडा रस्ता देतोय अपघातास आमंत्रण
By admin | Updated: August 30, 2014 23:54 IST