गोंदिया : जिल्ह्यात गोंदिया व तिरोडा या दोनच ठिकाणी एसटी महामंडळाचे आगार आहेत. गोंदिया आगारातून ८० पेक्षा अधिक बसेस प्रवाशी सेवा देतात. मात्र गोंदिया आगाराला कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांनी ग्रासले आहे. त्यामुळे आगार व बसस्थानकातील कारभार प्रभावित होत आहे.गोंदिया आगारात चालकांची संख्या जरी योग्य प्रमाणात असली तरी ३७ वाहकांची कमतरता आहे. ११ यांत्रिक कमी आहेत. त्यातच सहा यांत्रिक यावर्षी सेवानिवृत्त होणार आहेत. एका वाहतूक निरीक्षकाचा अभाव आहे. तर तीन वाहतूक नियंत्रकांची पदे रिक्त आहेत. आगारातील कार्यालयीन कामकाज सांभाळण्यासाठी चार लिपिकांची गरज असतानाही अद्याप ही पदे भरण्यात आली नाहीत. यांत्रिकांपैकी बॉडी फिटर दोन, वेल्डर एक, प्रमुख कारागिर एक, इलेक्ट्रीशियन एक, आर्ट अ चे एक पद रिक्त आहे. शिवाय सहायकांची तीन पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे गोंदिया आगार व बसस्थानकावरील कामकाज प्रभावित होत असून राज्य परिवहन महामंडळाने ही पदे भरण्याची तसदी घेतली नाही. याशिवाय चार ठिकाणी कंट्रोलरची मागणी करण्यात आल्याचे आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांनी सांगितले. यापैकी गोंदिया आगारात तीन तसेच सालेकसा, कामठा, डोंगरगाव व धापेवाडा येथे प्रत्येकी एक कंट्रोलर नेमण्यात येणार आहे. याशिवाय खासगी वाहतुकीला ऊत आला असून याचा फटका गोंदिया आगाराच्या उत्पन्नावर बसत आहे. गोंदिया शहरातून ठिकठिकाणी आॅटो व काळी-पिवळी वाहन धावतात. एवढेच नव्हे तर गोंदिया बस स्थानकासमोरून खासगी वाहन एसटीच्या प्रवाशांना घेवून जातो. या प्रकारामुळे आगाराच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
गोंदिया आगाराला रिक्त पदांचे ग्रहण
By admin | Updated: April 26, 2015 01:06 IST