बोंडगावदेवी : गावाशेजारी असलेल्या इटियाडोह धरणाचे पाणी बोंडगावदेवी परिसरातील वंचित असलेल्या १५ ते २० गावांना पुरविण्यात यावे या मागणीसाठी शिष्टमंडळाने राज्याचे अर्थ व नियोजनंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटून निवेदन दिले. येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे विदर्भ सल्लागार यशवंत उके यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील प्रसिध्द असलेल्या इटियाडोह धरणाची निर्मिती १९६५ मध्ये करण्यात आली. १९७३ पासून यातील पाण्यातून शेतीला पाणी पुरवठा करण्यात आला. धरणाच्या पाण्याखालील क्षेत्र ६३.५० दशलक्ष चौ.मी. असून क्षमता ३८१.५८७ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. ओलीत क्षेत्र १७९८० हेक्टर आहे. सदर धरणाचे पाणी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांना मिळून शेतकरी सुखी व समृध्द व्हावे हा उद्देश आहे. या धरणाचे पाणी अर्जुनी/मोरगाव मार्गे गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास ८० किमी प्रवास करीत आरमोरीपर्यंत शेतीला पाणी पुरवठा केला जातो. परंतू धरणापासून जवळच असलेल्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी परिसरातील १५ ते २० खेडेगावांना धरणाच्या पाण्याच्या ओलीतापासून वंचित ठेवण्यात आले आहे. परिसरातील जनतेला, गुराढोरांना, प्राण्यांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची तिव्र टंचाई निर्माण होत असल्याने कमालीचा मन:स्ताप सहन करावा लागतो. बोंडगावदेवी परिसरात जलसिंचनाच्या सोयींचा अभाव असल्याने येथील शेतकऱ्यांना एका पाण्यापासून धान उत्पादनापासून वंचित रहावे लागत आहे. शेतामध्ये बारमाही पिके घेण्यासाठी मुबलक प्रमाणात जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना वारंवार दुष्काळाशी सामना करावा लागतो. शतकऱ्यांची गंभीर समस्या लक्षात घेऊन इटियाडोह धरणाचा पाणी बोंडगावदेवी पसिरातील वंचित गावाना पुरवठा करण्यात यावा अशी मागणी परिसरातील जनतेची आहे. जनतेची मागणी विचारात घेता येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्यसनमुक्ती संघटनेचे विदर्भ सल्लागार यशवंत उके यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वरील आशयाचे लेखी निवेदन देवून समस्येची जाणीव करून दिली. याप्रसंगी परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. (वार्ताहर)
वंचित गावांना इटियाडोह धरणाचे पाणी द्या
By admin | Updated: November 22, 2014 23:04 IST