बहुजन क्रांतीकारी संघटनेची मागणी : बंँकेकडून टाळाटाळसालेकसा : केंद्र शासनाने बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी मिळावी व स्वत:चा रोजगार सुरू व्हावा यासाठी मुद्रालोन योजना सुरू केली व यासाठी युवकांना सहज ऋण मिळावे म्हणून तरतूद केली; परंतु शासनाच्या या योजनेची प्रत्यक्षात योग्य अंमलबजावणी होत नसून या योजनेत युवकांना सहज कर्ज मिळत नसल्याचे प्रकरण समोर येत आहेत. बँकानी बेरोजगार युवकांना विनाअट मुद्रा योजना अंतर्गत कर्ज द्यावे अशी मागणी विदर्भ बहुजन क्रांतीकारी विद्यार्थी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. देश व राज्यात वाढत्या लोकसंख्ये सोबतच बेरोजगार युवक-युवतींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यात शिक्षित बेरोजगारांची संख्या सुद्धा झपाट्याने वाढत आहे. एकीकडे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे तर दुसरीकडे शासनाची नोकरी मिळत नाही. अशात शिक्षित बेरोजगार युवक-युवती काम व नोकरीसाठी दर दर भटकत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या कौशल्य क्षमतेनुसार रोजगार किंवा काम व व्यवसायाची संधी मिळाली तर त्यांच्या जीवनात स्थैर्य येऊ शकते. या बाबी लक्षात घेता केंद्र शासनाने मुद्रा लोन योजना सुरू केली. यात कर्ज काढण्यासाठी अनेक नियम व अटींना शिथिल केलेले आहे. परंतु जेव्हा बेरोजगार युवक बँकांमध्ये कर्जाची मागणी करायला जातात तेव्हा बँक कर्ज देण्यासाठी कठीण नियम व अटी दाखवून टाळण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना जमिनस्तरावर साकारताना दिसून येत नाही. (तालुका प्रतिनिधी)म्हणे माहिती देता येत नाहीबँक अधिकाऱ्यांना मुद्रालोन अंतर्गत माहिती मागितली तर ती माहिती देता येत नाही असे सांगून हात काढण्याचा प्रयत्न करतात. आपल्या बँकेत मुद्रा योजना अंतर्गत किती अर्ज आले, किती लोकांना कर्ज देण्याचे लक्ष आहे, आतापर्यंत किती कर्ज दिले, यासह इतर माहिती मागितल्यास बँकेचे जबाबदार कर्मचारी नेहमी टाळाटाळ करीत असतात.
बेरोजगार युवकांना मुद्रा लोन विनाअट द्या
By admin | Updated: April 16, 2017 00:49 IST