गोंदिया : तालुक्यातील ग्राम बटाना येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीची सभा बुधवारी (दि. १५) घेण्यात आली. या सभेत कोरोना लसीकरण मोहिमेत गावकऱ्यांनी सहभाग नोंदवून १०० टक्के लसीकरण करण्यासह गावातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
सभेची सुरुवात ग्रामसेवक ठाकरे यांनी सादर केलेल्या प्रास्ताविकानुसार करण्यात आली. त्यानुसार, गावात कोणतेही साथीचे रोग पसरू नये म्हणून गावकऱ्यांनी आपापल्या परिसरात स्वच्छता ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच येणाऱ्या दिवसात गावात स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी सर्वांनी एकमताने होकार दिला. याव्यतिरिक्त डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून नागरिकांनी घरातील डबक्यात, भांड्यात, कुंड्यात पाणी साचून ठेवू नये, असे आवाहनही या वेळी करण्यात आले. गावात सुरू असलेल्या मोफत नळजोडणीत गावकऱ्यांनी सहभाग नोंदवून आपापल्या घरी नळजोडणी अवश्य करून घ्यावी, असे सांगितले गेले. विशेष म्हणजे, कोरोना लसीकरण मोहिमेत गावकऱ्यांनी शंभर टक्के सहभाग नोंदवून लसीकरण करून घ्यावे, अशी विनंती करण्यात आली. तसेच लहान मुलांचे कोरोनापासून संरक्षण कसे करावे यासंबंधी माहिती देण्यात आली. महिला व खासकरून मुलींची आरोग्य तपासणी, अंगणवाडी व शाळेला पुरविण्यात येणाऱ्या वस्तू संदर्भातही चर्चा करण्यात आली.
संचालन ग्रामसेवक ठाकरे यांनी केले. आभार भुमेश्वर येडे यांनी मानले. या बैठकीला सरपंच विजय कुसराम, उपसरपंच दीपक साठवणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष तोमेंद्र हरीणखेडे, धर्मराज रहांगडाले, करण येडे, कुंडलिक फुलबांधे, भुवन वटी, खुर्मराज वाघाडे, सतीश बिसेन, उमेश बागडे, विजू लांजेवार यांच्यासह गावकरी व समितीचे सदस्य उपस्थित होते.